पनवेल : पनवेल परिसरातून विविध राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात असल्याने मोठ्या प्रमाणात दळणवळण असलेल्या रस्त्यांकडे रात्रीच्या वेळेस उभ्या वाहनातून डीझेल चोरणारी टोळी सक्रिय आहे. मात्र ट्रक व ट्रेलरमधून डीझेल चोरणाऱ्यांनी पहिल्यांदाच गावातील उभ्या बसमधून डीझेल चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पनवेल बस आगारातील चालकाने याविषयी रितसर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरोधात तक्रार केली आहे.
हेही वाचा – उरण : अवजड कंटेनररुपी यमदूताना आणखी किती बळी हवेत?
पनवेल तालुक्यातील केळवणे गावामध्ये गुरुवारी पहाटे उभ्या असलेल्या बसमधून डीझेल चोरी झाल्याचे चालकाला समजले. चालकाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीमध्ये ४०५ लीटर डीझेल चोरले असून या डीझेलची किमंत ३८ हजार रुपये असल्याचे पोलिसांना सांगीतले. पोलिसांनी रस्त्याकडेला डीझेल चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी रात्रगस्तमध्ये वाढ करणे गरजेचे झाले आहे. विविध मोर्चे, आंदोलने, बंदोबस्त आणि गावागावांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये व्यस्त असलेल्या पोलिसांकडून सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून दिसत आहे.