उरण : जेएनपीए बंदर परिसरात रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनांतून डिझेलची चोरी होत आहे. गुरुवारी पहाटे आशा प्रकारे चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात वाहनचालकांना यश आले आहे. तर दोन चोरटे वाहनातून पसार झाले आहेत. या संदर्भात न्हावा शेवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याचा अधिक तपास करीत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेएनपीए बंदर परिसरात बंदरात जाण्याच्या प्रतीक्षेत असलेली हजारो वाहने रस्त्यावर उभी करण्यात येतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या वाहनातील डिझेलची चोरी करणारी एक टोळी या परिसरात सक्रिय होती. त्याची माहिती वाहनचालकांना मिळाल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला. चोरटे वाहनातून डिझेल चोरून जात असल्याची माहिती वाहन चालकांना मिळताच वाहनचालकांनी घटनेनंतर आपली वाहने रस्त्यावर आडवी – उभी केली आणि चोरट्यांची गाडी अडवून गाडी तपासली असता, त्यात डिझेलचे भरलेले ड्रम आढळून आले. यावेळी संतप्त झालेल्या वाहन चालकांनी चोरट्यांना चोप दिला. त्याचवेळी दोन चोरटे चोरीसाठी वापरलेल्या वाहनातून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
हेही वाचा – नवी मुंबई : आरटीओची वाहनांवर माझी माती माझा देश संदेश लिहून जनजागृती
हेही वाचा – पनवेल : तिरुपती बालाजी मंदिराची बांधणी पाणथळ जागेवर
या घटनेची माहिती मिळताच न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने चोरट्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.