नवी मुंबई: रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून डिझेल चोरी करण्याचे प्रकार एमआयडीसी, जेएनपीटी एपीएमसी भागात अनेकदा घडतात. मात्र आता कोपरखैरणे येथील निवासी वस्तीतील एका पार्क केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून डिझेल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने ट्रक मालकाने डिझेल चोरट्यांच्या गाडीचा क्रमांक पाहिल्याने डिझेल चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिलानी शेख आणि अरिफ शेख असे यात अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. कोपरखैरणे सेक्टर २३ येथे राहणारे सुभाष माने यांनी आपला ट्रक याच परिसरात एका ठिकाणी पार्क केला होता. एकीकडे रहिवासी वस्ती तर एकीकडे खाडी किनारा मध्ये रस्ता असा हा परिसर असून शांत परिसर म्हणून ओळखला जातो. ८ तारखेला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास माने यांच्या ट्रकच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून आत पाईप टाकून डिझेल चोरी करत होते. सुदैवाने माने यांनी हे पहिले, मात्र जोपर्यंत माने चोरट्यांच्या नजीक पोहोचतील तोपर्यंत चोरट्यांनाही माने येत असल्याची चाहूल लागली आणि ते पळून गेले.

हेही वाचा – भांडवलदारांच्या विकासासाठी एमएमआरडीएला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, १२४ गावांत करणार जनजागृती

हेही वाचा – मुंबई- नवी मुंबई- बदलापूर नवा मार्ग?

चोरटे ज्या एर्टिगा गाडीतून पळून गेले त्या गाडीचा क्रमांक माने यांनी लक्षात ठेवत याबाबत पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून गुन्हा नोंद करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी एक पथक स्थापन केले. यात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वने, पोलीस हवालदार औदुंबर जाधव लहू ठाकर यांचा समावेश होता. सदर पथकाने गाडीचा शोध घेतला असता तांत्रिक तपासात गाडीचा ठावठिकाणा शोधत गाडीचा माग काढला. गाडीचा शोध लागताच गाडी चालक आणि त्याचा साथीदार जिलानी शेख आणि अरिफ शेख यांना अटक केली. या गाडीत तब्बल २६ हजार ६०० रुपयांचे डिझेल ३५ लिटरचे ८ कॅन, आढळून आले. हा ऐवज आणि  साडेसहा लाखांची एर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diesel thieves now in residential areas diesel theft at kopar khairane ssb