रेल्वेकडून नागरिकांना पाणीपुरवठय़ाची परवानगी; ठाण्यासाठी आग्रह
दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून धरण बांधले आहे. पण या धरणाच्या पाण्याचा रेल्वेकडून वापर करण्यात येत नसल्याने या धरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. पुरेशा देखभाल दुरुस्ती अभावी ब्रिटिशकालीन धरणांच्या भिंतीमधून पाणी पाझरत आहे. या दुर्लक्षित असणाऱ्या भिंतीची डागडुजी करण्यात आलेली नाही. दुष्काळजन्य परिस्थिती पाहता या दुर्लक्षित धरणाचे पाणी तूर्तास नवी मुंबईकरांना देण्याचे ठरले असले तरी ठाण्यातील काही राजकीय नेत्यांनी यासाठी आग्रह धरल्याने नवे वादंग सुरू झाले आहे.
या धरणातील पाणी टँकरच्या साहाय्याने उचलण्यास मंजुरी मिळावी यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी आणि खासदार राजन विचारे यांनी गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला होता. अखेर नवी मुंबईकरांना पुढील तीन महिन्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. असे असले तरी या दुर्लक्षित धरणाची डागडुजी करून त्यामधील पाणी कायमस्वरूपी कसे वापरात आणले जाईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे नियोजन क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. या धरणातील पाण्याची पातळी किती आहे. याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे हे पाणी नेमके किती दिवस पुरेल हे नक्की सांगता येणार नाही, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईतील दिद्या परिसरात इलठण पाडा या ठिकाणी रेल्वेचे हे ब्रिटिशकालीन धरण आहे. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी हिल्टन यांनी ही जागा शोधली. रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकाची बांधणी सुरू केली तेव्हा या धरणाची उभारणी केली. रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या या धरणाची क्षमता ५० दक्षलक्ष लिटर इतकी आहे. २० एकर परिसरात हे धरण असून ४० फुटांपेक्षा अधिक खोली आहे. या धरणाच्या पाण्याचा रेल्वे आता उपयोग करत नसल्याने येथील एकूणच व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या धरणात गाळ साचला आहे. या धरणातील पाण्याचा वापर आजूबाजूचे आदिवासी आणि झोपडपट्टीतील नागरिक कपडे धुण्यासाठी वापरतात, तर तबेलेवाले म्हशी येथे आणून धुतात.
पिण्यासाठी अयोग्य
मात्र पाणी दूषित असल्याने ते पिण्यासाठी योग्य नसल्याचे कार्यकारी अंभियता अरविद शिंदे यांनी स्पष्ट केले. पाण्यावर प्रक्रिया करून पाणी वापरण्यात येऊ शकते. या दुर्लक्षित पाणथळापाशी पोहचणे कठीण असल्याने रस्त्यापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार असून यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी निविदादेखील काढण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेला परवानगी
राज्यात दृष्काळजन्य परिस्थिती असून याचा फटका नवी मुंबईकरांनादेखील बसत आहे. दिघा इलठण पाडा येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या पाण्याचा वापर रेल्वेकडून करण्यात येत नव्हता. नवी मुंबई महानगरपालिका या धरणातील पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू होता. मात्र, रेल्वेने या धरणाच्या हस्तांतरणास विरोध केला. या धरणाचे पाणी कळवा तसेच आसपासच्या परिसरास पुरविले जावे यासाठी ठाण्यातील काही पक्ष कमालीचे आग्रही बनले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रश्नावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. असे असताना खासदार राजन विचारे व जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी रेल्वेकडून पाठपुरावा करून धरणातील उपलब्ध पाणी आसपासच्या परिसरास पुरविण्याची परवानगी पदरात पाडून घेतली आहे. रेल्वेने तीन महिन्यांसाठी पाण्याचा उपयोग करण्याची परवानगी नवी मुंबई महापालिकेला दिली आहे.
शरद वागदरे,