पनवेल : रेल्वेस्थानकासमोर इतर स्टॉल हटवून अपंग व्यक्तीचे स्टॉल चालावेत यासाठी एका स्टॉलधारकाने मंगळवारी सकाळी पनवेल पालिकेसमोर अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि सूरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करुन अनर्थ टाळला. मात्र या घटनेमुळे स्टॉलधारकांची आपसामधील व्यावसायिक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हेही वाचा >>> पनवेल पालिकेच्या ३७७ जागांसाठी १ लाख १५ हजार अर्जांची नोंदणी; अर्ज नोंदणीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक
दिपक घाग असे या अपंग व्यक्तीचे नाव असून पालिका स्थापन झाल्यावर घाग यांना पालिकेने रेल्वेस्थानकाबाहेरील रस्त्याकडेला स्टॉल चालविण्यासाठी तात्पुरता परवाना दिला. परंतू घाग यांच्या समोरील रस्त्यावर अजून तीन दूकाने अनधीकृत सूरु झाल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणने आहे. घाग यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन त्या तीन स्टॉलधारकांवर कार्यवाही करण्यास भाग पाडले. परंतू काही दिवसांनी पुन्हा ही दूकाने सूरु झाल्याने घाग यांनी मंगळवारी पालिकेसमोर पोलीस बंदोबस्त असताना स्वताच्या दुचाकीने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर घाग यांनी दुचाकीतून बाटलीतून आणलेले रॉकेल अंगावर ओतण्याचा प्रयत्न करत असताना सूरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले.
हेही वाचा >>> पनवेल : सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी आशा वर्करची निदर्शने
घाग व कुटूंबिय मंगळवारी दुपारीपर्यंत पालिकेसमोर इतर दूकानांवर कार्यवाहीची मागणी केली. पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी पालिका प्रशासन फेरीवाला धोरणानूसार कार्यवाही करत असल्याचे सांगीतले. तसेच फेरीवाला धोरणानूसार सर्वेक्षणात नोंद झालेल्या व्यक्तींना जागा देण्याची लवकरच पालिका कार्यवाही करेल असे उपायुक्त डॉ. विधाते यांनी स्पष्ट केले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिऩ ठाकरे यांनी या घटनेनंतर घटनास्थळी नेमके अपंग स्टॉल धारकांचा काय वाद झाला याची माहिती घेण्याचे आदेश पोलीसांना दिले.