नवी मुंबई : ठाण्याची जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्याने नवी मुंबई भाजपमध्ये नाराजी होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी शिष्टाई केली. फडणवीस यांनी आमदार गणेश नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मंगळवारपासून भाजप कार्यकर्ते प्रचारात सहभागी होतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी खासदार संजीव नाईक यांनी ठाण्यात उमेदवारीसाठी तयारी करीत मतदारसंघात संपर्क अभियान सुरू केले होते. मात्र शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी पदाचे राजीनामे दिले होते, तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांची भेट घेत संजीव नाईक यांना संधी देण्याची मागणी केली होती.

कार्यकर्त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी खारघर येथील सभा आटोपून देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, संजीव नाईक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

खासदार शिंदे गटाचे असले तरी नवी मुंबईच्या विकासात बाधा येणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

कार्यकर्त्यांचा आक्षेप

फडणवीस हे संवाद साधत असताना नवी मुंबई मनपात ठाण्याकडून होणाऱ्या हस्तक्षेपबाबत तक्रारी काही जणांनी फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. ठाण्यातून नवी मुंबईची पालिकेतील सूत्र हलवली जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. मात्र नवी मुंबई विकासाबाबतच फक्त बोलणे झाले, असे संदीप नाईक यांनी नमूद केले.

नवी मुंबई, मीरा भाईंदर येथील मनपातील भाजपचे प्राबल्य पाहिले असता ठाण्यातील जागा भाजपला मिळेल अशी आशा होती. नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. मात्र नवी मुंबईच्या विकासाला खीळ बसणार नाही, असे आश्वासन आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे आम्ही मंगळवारपासून प्रचारात उतरू. –संदीप नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न

मोदींच्या हाती देश सुरक्षित

पनवेल: पंतप्रधान मोदी यांच्या हाती देशाची सूत्रे असल्यानंतर पाच वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला नाही. यापूर्वीच्या काँग्रेस राजवटीतील पंतप्रधान बॉम्बस्फोट झाले की निषेध व्यक्त करत होते असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे केला.

त्यावेळचे सरकार बॉम्बस्फोट झाला की तीव्र निषेध करत. त्यानंतर पुन्हा बॉम्बस्फोट झाले की तत्कालीन पंतप्रधान लाचारीने अमेरिकेकडे जायचे. मात्र बॉम्बस्फोटाची मालिका थांबत नव्हती. मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर थेट पाकिस्तानात लक्ष्यभेद केल्याने मागील पाच वर्षांत एकही बॉम्बस्फोट झाला नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी खारघर येथील प्रचारसभेत केले. मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून यंदाच्या डिसेंबर महिन्यापूर्वी पहिले उड्डाण होईल. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे पहिल्या विमान उड्डाणावेळी दि. बा. पाटील यांच्या नावाची उद्घोषणा केली जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion with mla ganesh naik along with party workers to remove displeasure over thane seat zws