नवी मुंबई : सावज हेरून वाहन चोरी करणारे प्रकार नवी मुंबईत वाढत आहेत. असाच प्रकार पुन्हा समोर आला असून पार्क केलेली रिक्षा काही क्षणात चोरी झाली. विशेष म्हणजे रिक्षा चोरी होऊ शकते या शंकेने रिक्षा चालकाने पार्क केलेल्या रिक्षावर बारीक नजर ठेवली होती. मात्र बोलण्याच्या ओघात थोडे लक्ष विचलित झाले आणि रिक्षा चोरी झाली. 

मुंबईतील वांद्रे येथे राहणारे आफताब अजगरअली शेख हे परतीचे भाडे घेऊन रिक्षात वाशी येथे आले होते. वाशीतील इनॉर्बिट मॉलच्या पाठीमागील ट्रक पार्किंग लागत रस्त्याच्या कडेला रिक्षा पार्क केली. त्यांनी रिक्षात घेऊन आलेले प्रवासी हे ट्रक टर्मिनल मध्ये गेले. त्यांना येण्यास उशीर झाल्याने शेख हे त्यांना पाहण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी रिक्षा चोरीला जाऊ नये म्हणून दोन वेळेस रिक्षा जागेवर आहे का हे पाहून पुन्हा ट्रक टर्मिनस मध्ये गेले व तेथूनही त्यांची नजर पार्क केलेल्या रिक्षावर होती. मात्र काही वेळ बोलण्यात थोडे दुर्लक्ष झाले आणि नेमक्या त्याच वेळेस अनोळखी व्यक्तीने त्यांची रिक्षा चोरी केली. रिक्षा जागेवर नसल्याचे लक्षात आल्यावर शेख यांनी खूप शोधाशोध केली.  मात्र रिक्षा आढळून न आल्याने शेवटी वाशी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीची तक्रार दिली. 

आणखी वाचा-बेकायदा नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम; पाणीपुरवठा विभागाची आज बैठक

यापूर्वीही भुर्जी पाव ऑर्डर देण्यासाठी पार्क केलेली दुचाकी चोरी, लघुशंकेला गेल्यावर तेवढ्याच वेळेत रिक्षा चोरी, दुकानात खरेदीसाठी गेले असता कार चोरी असे प्रकार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडले असल्याने सावज हेरून वाहन चोरी होत असल्याची शंका पोलिसांनीही व्यक्त केली आहे. 

Story img Loader