नागालँड मधील आर.पी.आय. विजया नंतर आठवले गटात उत्साह वाढत असून नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावा आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. नवी मुंबईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात ते आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबाबत ही भाष्य केले.
आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान उमेदवार असल्याचे भाष्य केले होते त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद संभाळतां आले नाही आणि मोदी यांना हरवणे येड्या गबाळ्याचे काम नाही. तसेच उध्दव ठाकरे यांनी कॅाग्रेस, राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केल्याने एकनाथ शिंदे यांनी बंड केले. याला लोकांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा >>> “…तर अकोला लोकसभा लढवणार”, अमोल मिटकरींचं मोठं विधान
नुकत्याच पार पडलेल्या कसबा पोट निवडणुकी बाबत बोलताना त्यांनी कसबा निवडणूकीत आघाडीला यश मिळाले असले तरी महाविकास आघाडीने हूरळून जावू नये, असा सल्ला त्यांनी दिला. कर्नाटक, राजस्थान निवडणूकीत सुध्दा भाजपाला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आरपीआय मधील आजी माजी अध्यक्षांचा अंतर्गत वाद कार्यक्रमा दरम्यान चव्हाट्यावर आला. मात्र दोघांनाही सबुरीचा सल्ला आठवले यांनी देत पक्ष कार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तसेच पक्ष शिस्तीवर भर द्या अन्यथा घरात बसा असा गर्भित इशाराही दिला.