नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विजेचे देयक (बील) भरले नसल्याचा फोन अनेकांना येत आहे. वास्तविक हे फोन फसवणूक करणाऱ्यांचे येत आहे आणि त्यांचा आणि महावितरणाचा काहीही सबंध नसतो. असाच एक फसवणुकीचा प्रकार नवी मुंबईत घडला असून या बाबत फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणने ऑनलाईन वीज देयक भरण्याची सुविधा निर्माण केली आहे. याचाच गैरफायदा घेतला जात आहे. सध्या गेल्या काही महिन्यांपासून वीज देयक भरले नाही म्हणून फोन येत आहेत. असाच एक फोन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कामोठे येथे राहणाऱ्या हरीपालसिंग बिश्ता यांना आला त्यात वीज देयक भरले नाही म्हणून आम्ही कनेक्शन कट करत आहोत असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला आम्ही वीज देयक ऑनलाईन भरले असल्याचे सांगितले. त्यावर समोरील व्यक्तीने अपडेट झाले नसल्याचे सांगत अजून १० रुपये भरा मग आपोआप लगेच अपडेट होईल व वीज कनेक्शन कापले जाणार नाही असे सांगितले. यासाठी क्विक सपोर्ट अँप डाऊन लोड करण्याचे सांगितले. त्यानुसार हरीपालसिंग यांनी हे अँप डाऊनलोड करून त्यात बँकेची माहिती भरली व १० रुपये भरले. मात्र त्या व्यक्तीने पुन्हा फोन करून १० रुपये मिळाले नाहीत असे सांगत दुसरे एखादे बँक खाते असेल तर त्यातून भरा असे सांगितले.
हेही वाचा:नवी मुंबई: जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत महापालिकेच्या २३४ शाळा सहभागी
हरीपालसिंग यांनी तत्काळ दुसऱ्या बँक खात्यातून पैसे भरले व त्यांना फोन करून १० रुपये भरल्याचे सांगितले. मात्र अचानक त्यांना एका बँकेतून २० हजार १४८ आणि दुसऱ्या बँकेतून ७३ हजार ५०० असे मिळून ९३ हजार ६४८ रुपये अँप मधील खात्यात वर्ग झाल्याचा मेसेज आला. ही घटना ११ तारखेला घडली. या फसवणुकीबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस पुढील तपास करीत आहे.
हेही वाचा:रेलिगेयर आरोग्य विमा कंपनीविरोधात नवी मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल
अशा प्रकारचा फोन महावितरण करीत नाही. खाजगी फोन वरून फोन आला तर कुठलाही आर्थिक व्यवहार माहिती देऊ नका . काही शंका असेल तर शक्यतो थेट संपर्क करावा असे आवाहन ग्राहकांना आम्ही नेहमीच करीत असतो. त्यासाठी थेट बोलून, पत्रक काढून प्रसिद्दी माध्यमांची यासाठी मदत घेतली जाते. कृपया अशा अनोळखी व्यक्तींच्या फोन वर विश्वास ठेवू नका. – ममता पांडे (जनसंपर्क अधिकारी महावितरण)