पनवेल ः मावळ येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कळंबोली येथील अमर रुग्णालयाचे मालक आणि पीडितेवर उपचार करणारे डॉ. अर्जुन पोळ यांना अटक केली आहे. डॉ. पोळ यांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
६ ते ९ जुलै या दरम्यान मावळ मध्ये राहणाऱ्या पीडितेला गर्भपातासाठी कळंबोली येथील अमर रुग्णालयात आणले होते. पीडितेसोबत तिचे दोन व पाच वर्षांची बालकं होती. पीडितेचा मृत्यू अमर रुग्णलयात झाल्यावर तिच्या प्रियकर आणि त्याच्या साथीदाराने तीचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला होता. बालकांनी त्यांच्या आईला इंद्रायणीत फेकल्याचे पाहून हंबरडा फोडल्याने प्रियकर व त्याच्या साथीदाराने जिवंत बालकांना इंद्रायणीत फेकून दिले होते. या घटनेनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर एकापाठोपाठ एक आरोपींना अटक केली.
अमर रुग्णालयातील डॉ. पोळ यांची मागील तीन दिवसांपासून चौकशी सुरु होती. अखेर तळेगाव एमआयडीसी पोलिसांना चौकशीअंती डॉ. पोळ यांना अटक केल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम म्हस्के यांनी लोकसत्ताला दिली. डॉ. पोळ यांनी पीडितेचा उपचारानंतर मृत्यू झाल्याची बाब स्थानिक पोलिसांपासून लपवून ठेवली. पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यास अनेक बाबी स्पष्ट होऊ नये म्हणून बनाव करण्यात आल्याचा आरोप डॉ. पोळ यांच्यावर करण्यात आला होता. डॉ. पोळ यांना सरकारी वैद्यकीय अधिकारी ते वैद्यकीय अधीक्षक पदापर्यंत सेवेचा अनुभव होता. पनवेल महापालिकेने मनसेच्या आंदोलनानंतर डॉ. पोळ यांच्या अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द केली आहे.
पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने चार महिन्यांपूर्वी एका प्रसुतीदरम्यान मातेचा मृत्यू झाल्याने डॉ. पोळ यांना अमर रुग्णालयत एकही नवीन रुग्ण दाखल (अॅडमीट) करु नये याबाबत नोटीस दिली होती. तरीही डॉ. पोळ यांनी मावळच्या पीडितेवर दाखल करुन दिवसभर उपचार केले. या घटनेनंतरही नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने कोपरखैरणे येथील सेक्टर ६ मधील रोहाऊस क्रमांक ७६ मध्ये दवाखान्याची नोंदणी कायम ठेवली आहे.