नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन दिवसांत महिला अत्याचाराचे चार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नातेवाईकांकडून मारहाण, कौटुंबिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे गुन्हे नोंद असून यात पती विरोधातही एक गुन्हा नोंद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच कोपरखैरणे येथे चारित्र्याच्या संशयावरून एका पुरुषाने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. आजही (मंगळवारी) पतीविरोधात त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील पीडित महिला आपल्या माहेरी आली असता पतीने तिच्या घरी येऊन तिला आणि तिच्या पालकांना शिवीगाळ करीत पीडित महिलेला धक्काबुक्की केली. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर पतीने पत्नीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. घरगुती वादातून सदर प्रकार घडला असून याबाबत पोलीस ठाण्यात पती विरोधात शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी आणि विनयभंग प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा… बामणडोंगरीतील दुकानाना प्रतिचौरस मीटरला तीनपट चढ्या दराने भाव, मंगळवारी सिडको भवनात २४३ दुकानांच्या विक्रीची सोडत

दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांचे भाऊ आहेत. दोघेही बांधकाम व्यवसायाशी निगडित व्यवसाय करीत असून २१ तारखेला यातील फिर्यादी भाऊ गावी गेला होता. त्याच वेळी आरोपी भावाने फिर्यादीच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली व अल्पवयीन मुलीस मारहाण केली. यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या पत्नीला म्हणजे स्वत:च्या वहिनीच्या हातावर हेल्मेट मारले. त्यांच्या लहान मुलीचे केस पकडून मारहाण केली आहे. या प्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कलमान्वये २२ तारखेला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा… दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर दर्यात जाण्यास नाखवा सज्ज

तिसऱ्या प्रकरणात नेरुळ येथे राहणारा आरोपी राज जाधव याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित आणि आरोपी हे दोघे एकमेकांना ओळखत होते. पीडित अल्पवयीन आहे हे माहिती असूनही आरोपीने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी राज याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

गर्भवती तरुणीचा मृत्यू

नवी मुंबईत काही महिन्यांपूर्वी एक युवती राहण्यास आली होती. ती अल्पवयीन असताना गर्भवती होती. १८ तारखेला राहत्या घरात एकटी असताना ती न्हाणी घरात पडली व तेथेच ती बाळंत झाली. खूप वेळ फोन करून फोनला प्रतिसाद देत नसल्याने तिच्या पालकांनी शेजारी राहणाऱ्यांना विचारणा केली असता शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केल्याने सदर प्रकार उघडकीस आला. तिला रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला तर उपचार सुरू असताना तिच्या बाळाचाही मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी हेमंत गौतम या तरुणाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये सोमवारी गुन्हा नोंद केला. हा गुन्हा नवी मुंबईत घडला नसल्याने संबंधित पोलीस ठाण्याकडे तपास वर्ग केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domestic vilonace against women multiple fir registered in navi mumbai sud 02