पनवेल: पनवेल महापालिका परिसरामध्ये यंदाच्या गणेशोत्सवात ३२१ गणेशमूर्ती दान करण्याचाा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलेल्या कुटूंबियांनी घेतला. मूर्तीदान करणा-या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मान महापालिकेच्या कर्मचारी वृंद सार्वजनिक मित्रमंडळाने मिळविला.
महापालिका प्रशासनाने गणेशमूर्ती दान करणा-या कुटूंबियांना ‘पर्यावरण दूत’ अशी पदवी दिली आहे. गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाच्या रात्री ८२ कुटूंबियांनी स्वताजवळील गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या अधिका-यांकडे सोपविली. महापालिका परिसरात यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ४६६३ गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्यात आले.
हेही वाचा… नवी मुंबई: ॲपे चोरणारी टोळी अटक; ८ लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त; १० ॲपे हस्तगत
पनवेल महापालिकेने यंदाचा गणेशोत्सवामध्ये नैसर्गिक तलावांचा परिसर प्रदूषित होऊ नये यासाठी जनजागृतीसाठी विविध स्तरावर प्रयत्न केले. महापालिका क्षेत्रात यंदाच्या गणेशोत्सवामध्ये २७ हजार ६६४ गणेशमूर्तींचे प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यापैकी नैसर्गिक तलावामध्ये २२ हजार ६८१ मूर्ती विसर्जित झाल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. अनंत चतुर्दशीच्या रात्री विविध विसर्जन घाटांवर ५५ मेट्रीक टन निर्माल्य जमा झाले होते. यापूर्वी ही गणेश विसर्जनावेळी दोनशे मेट्रीक टन निर्माल्य जमा झाले असून या निर्माल्यामधून महापालिका सिडको मंडळाच्या घोट येथील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात खत बनविले जाणार आहे.
हेही वाचा… पनवेल पालिका आयुक्त निवासात गणेशमूर्तीचे विसर्जन
महापालिका कर्मचा-यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा व्यतिरीक्त पालिका प्रशासनाच्या आवाहनाला पालिका परिसरातील कोणत्याही मंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. रात्री उशीरापर्यंत साडेअकरा वाजेपर्यंत सार्वजनिक मंडळांनी आवाजाची मर्यादा सोडून वाजतगाजत विसर्जन मिरवणूका पनवेल शहर आणि उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यावरुन काढल्या.