नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथे एका हॉटेल बार समोर ग्राहक म्हणून आलेल्या टोळक्यातील एकाने हॉटेल बाहेर लघु शंका करत असल्याचे पाहताच व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला जाब विचारत अडवले. त्यावर त्यालाच मारहाण करीत त्याच्या अंगावर गाडी घातली. त्याने पडू नये म्हणून बोनेटला पकडले आणि तरीही गाडी न थांबवता तशीच नेली. हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेल पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका वळणावर बोनेटवरून तो व्यवस्थापक खाली पडला. या घटने बाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
तुर्भे येथील म्युझिक बारमध्ये रात्री दहाच्या सुमारास एका कारमध्ये चौघेजण आले. त्यातील दोन जणांनी मद्य व खाण्याच्या काही वस्तू विकत घेतल्या व हॉटेल बाहेर निघाले. तेवढ्यात त्यांच्या पैकी एक जण खाली उतारला आणि हॉटेल बाहेरच लघुशंका करू लागलाय. हे हॉटेल व्यवस्थापकाने पहिले व लगेच बाहेर येत येथे लघुशंका करू नका म्हणून दरडावले. त्यावरून त्यांची बाचाबाची झाली. तेवढ्यात शेजारील दुकानदारही येथे आला व त्यानेही जाब विचारला. त्यामुळे चौघांनी या दोघांना मारहाण केली व गाडीत बसले.
हेही वाचा >>> मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा दौरा सूरू
गाडी समोर न काही अंतरावर हॉटेल व्यवस्थापक उभा होता . गाडी चालकाने अचानक गाडी सुरु करून गाडी व्यवस्थापकाच्या अंगावर घातली तेवढ्यात व्यवस्थापकाने बोनेटला पकडले. तशाच अवस्थेत गाडी चालकाने गाडी पुढे नेली. जेव्हा हि गाडी शीव पनवेल मार्गावर वळण घेत होती त्यावेळी बोनेट पकडून असलेले व्यवस्थापक खाली पडले. त्यांना मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे. या बाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख तन्वीर यांनी दिली.