नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने ऐरोली सेक्टर १५ येथे साकारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य ज्ञानस्मारक हे सध्या देशातील स्मारकांमध्ये अग्रगण्य ठरत आहे. मागील सव्वातीन वर्षांत या स्मारकाला ३ लाख ६१ हजाराहून अधिक नागरिकांनी भेट देत बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
नवी मुंबई पालिकेच्या वतीने ऐरोली येथील सेक्टर १५ येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकात बाबासाहेबांचा जीवनप्रवास दाखविणारे दुर्मिळ छायाचित्र संग्रहालय, आभासी चित्रप्रणालीद्वारे बाबासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी विशेष कक्ष, ध्यानकेंद्र, संविधान दालन अशा विविध सुविधा तसेच आधुनिक ‘ई लायब्ररी’सह ग्रंथालय आहे. ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार या स्मारकातून व्हावा यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेची याठिकाणी विविध व्याख्याने पार पडली आहेत. तसेच बाबासाहेबांच्या जयंतीपूर्वीच्या पंधरवड्यात देखील विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्मारकात दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी सुमारे ३०० हून अधिक नागरिक भेट देत असतात. तसेच जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिन आणि बुद्ध पौर्णिमा या दिवशी भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या सात ते आठ हजारांवर जात असते. अनेक संस्था, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यां शिक्षक या स्मारकात येत असतात. मागील सव्वातीन वर्षांत म्हणजे डिसेंबर २०२१ पासून एप्रिल २०२५ पर्यंत भेट दिलेल्या नागरिकांचा आकडा हा ३ लाख ६१ हजाराहून अधिक इतका असल्याची माहिती समोर आली आहे.
जागर कार्यक्रम
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालिकेच्या वतीने महोत्सवापूर्वीच्या पंधरवड्यात ‘जागर’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘विचारवेध’ व ‘जागर’ या व्याख्यानमालांमधून विचारवंतांनी भाषणांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार मांडले. यंदाच्या ‘जागर २०२५’मध्ये प्रा. प्रवीण दवणे, डॉ. हरीश वानखेडे, श्री. अरुण म्हात्रे, प्रा. हर्षद भोसले, श्रीम. छाया कदम, प्रा. मृदुल निळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सहभाग होता.