डॉ. नरेंद्र जाधव यांचे प्रतिपादन
देशातील विविध जाती-धर्मातील, प्रांतातील आणि भाषिक नागरिकांना एकसंधपणे घट्ट बांधून ठेवणारा पवित्र ग्रंथ म्हणजे आपले भारतीय संविधान. प्रत्येक भारतीयाला संविधानाची किमान माहिती असायलाच हवी. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत संविधान पोहोचवणे आणि त्यानुसार प्रत्येकाला आपला मूलभूत अधिकार मिळणे हीच संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन प्रख्यात अर्थतज्ज्ञ तथा नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी वाशी येथे केले.
नवी मुंबई महानगरपालिका आणि अांभीरा या सामाजिक संस्थेतर्फे २६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर तसेच थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. जाधव यांचे ‘आपले संविधान आपला आत्मसन्मान’ या विषयावर विष्णुदास भावे नाटयगृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के आदी उपस्थित होते.
जर्मनीमध्ये प्रत्येक मुलाला अठराव्या वाढदिवशी देशाच्या संविधानाची प्रत भेट देण्याची पंरपरा आहे. त्या पाश्र्वभूमीवर शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीदशेतच प्रत्येकाला संविधानाचे ज्ञान मिळावे म्हणून नागरिकशास्त्र हा विषय बंधनकारक करून त्यात ५० टक्केअभ्यासक्रम हा भारतीय संविधानाशी निगडित असेल, हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे जाधव यांनी सांगितले. सतराव्या कलमानुसार देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असली तरी अजूनही दलित अत्याचाराचे गुन्हे दाखल होतच आहेत, मात्र त्यात शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. समाजातील विषमता अद्याप कमी झाली नाही, असे जाधव म्हणाले.