सातत्यपूर्ण कारवाई, जनजागृतीमुळे वाहतूक पोलिसांना यश
नवी मुंबई : नवी मुंबईत मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जनजागृती, वाहतूक पोलिसांकडून केली गेलेली कारवाई आणि वाढीव दंडाची रक्कम या मुळे ही संख्या घटल्याचे सांगितले जात आहे. २०१८ आणि २०१९ची ऑक्टोबर या कालावधीतील तुलना करता एकूण मद्यपी चालकांच्या संख्येत २५९ ने घट झाली आहे.
रस्ते अपघातातील अनेक कारणांपैकी मद्यप्राशन करून गाडी चालवणे हे एक कारण आहे.जानेवारी ते आक्टोबर २०१९ या कालावधीत एक हजार ९९३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात २९ लाख ९० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २०१८मध्ये याच कालावधीत दोन हजार २५२ जणांवर करण्यात आली आहे. या कारवाईत २८ लाख ९८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या शिवाय जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत एकूण २ हजार ९४९ जणांवर कारवाई करण्यात आील. यात ३३ लाख ९५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.२०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षांची तुलना केल्यास केवळ जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीतील कारवाईत २०१९ मध्ये २५९ कारवाई कमी झाल्या आहेत तर दंड रक्कम ९२ हजार ३०० रुपयांनी कमी झाला आहे. २०१८ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान दोन हजार २५२ कारवाईत २८ लाख ९८ हजार २०० रुपये दंड वसूली झाली होती.
जुलै, ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई
मद्यपी वाहनचालकांवर नियमित कारवाई होते, तर ३१ डिसेंबर व १ जानेवारीला विशेष अभियान असते. मात्र वर्षभरात सर्वाधिक कारवाई जानेवारी ते डिसेंबर त्या खालोखाल जुलै आणि ऑक्टोबरमध्ये होत.
वाहन चालकांमध्ये जागृती, याशिवाय ब्रेथ अॅनालायझरची पुरेशी संख्या असल्याने जागेवर कारवाई शक्य झाली आहे. कारवाईतील सातत्यामुळे आणि कायद्याची जरब बसल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.
-सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक शाखा