दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्याने टंचाईग्रस्त भागातील अनेक कुटुंबे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे भागांत ठाण मांडले आहे. यात नवी मुंबईतील टंचाईग्रस्तांची संख्या नोंद घेण्यासारखी आहे. नवी मुंबईतील प्रशस्त रेल्वे स्थानके आणि उड्डाणपूल ही या दुष्काळग्रस्त भागातील बांधवांची सध्या वसतिस्थाने होऊ लागली आहेत. काही सेवाभावी संस्था या दुष्काळात होरपळलेल्या बांधवांना अन्न, वस्त्र देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राज्यात विदर्भ आणि मराठवाडय़ात या दुष्काळाच्या कळा अधिक तीव्र होत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे साडेचार हजार टँकर दिवसाला गावातून फिरत आहेत. तरीही प्यायलाच पाणी मिळत नसल्याने आंघोळ, कपडे धुण्याचा विचार करणे दुरापास्त झाले आहे. त्यात मुंबई, पुण्यात काम करणाऱ्या कुटुंबातील नोकरदारामार्फत नागरिकांची कशीबशी गुजरण सुरू आहे; मात्र ज्यांचे कोणीच वाली नाहीत त्यांची पाऊले मुंबई, नवी मुंबईकडे वळू लागली आहेत. त्यामुळे मिळेल ती रेल्वे गाडी पकडून विनातिकीट ही कुटुंबे मुंबईत येत आहेत.
मुंबईत झोपडपट्टी दादा, गर्दुल्ले आणि रेल्वे पोलिसांचा होणारा त्रास पाहता अनेक दुष्काळग्रस्त बांधवांनी नवी मुंबईकडे आपला मोर्चा वळविला आहे. जेमतेम बारा लाख लोकसंख्या असणाऱ्या नवी मुंबईत प्रशस्त अशी रेल्वे स्थानके असून बारापेक्षा जास्त छोटे मोठे उड्डाणपूल आहेत. त्याखाली या नागरिकांनी सध्या आधार घेतला आहे. यातील काही नागरिक पूर्व बाजूस असलेल्या झोपडपट्टीतदेखील नातेवाईकांच्या आसऱ्याला गेले आहेत. उघडय़ावर राहणाऱ्या या दुष्काळग्रस्त बांधवांची प्रातर्विधी रेल्वे स्थानकात असणाऱ्या शौचालयात आटोपत आहेत.
उच्चभ्रू वस्तीत भीक
वडापाव, हॉटेलमधील उरलंसुरलं अन्नावर दुष्काळग्रस्त गुजराण करीत आहेत. वाशी सेक्टर १७ सारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत भीक मागितली जात आहे. ज्या भागात मॉल, शॉपिंग सेंटर हॉटेलांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी भीक वा अन्न मागत असल्याचे दिसून येते. बळीराम व गीता कांबळे हे मराठवाडय़ातील जोडपे सध्या या भागात फिरत असून त्यांचा एकुलता एक मुलगा काही दिवसांपूर्वी अपघातात मूत्यू पावला.