|| शेखर हंप्रस

नवी मुंबई पालिसांची कारवाई; ९२ जणांना अटक; ५६ गुन्हे दाखल

नवी मुंबईतील तरुण, कामगार अमली पदार्थाच्या आहारी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २०१६ पासून सप्टेंबर २०१८ पर्यंत दोन वर्षांत पोलिसांच्या कारवाईत तब्बल २ कोटी २० लाख २१६ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या व्यसनांमुळे नवी मुंबई पोलिसांना अमली पदार्थ जनजागृती सप्ताह साजरा करावा लागला.

या शहरात दोन प्रकारचे अमली पदार्थ सेवन करणारा वर्ग आहे. एक म्हणजे झोपडपट्टी आणि दुसरे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी. झोपडपट्टी भागात अमली पदार्थ घेणारे जास्त करून गांजा,चरस यांचे सेवन करतात, तर महाविद्यालयीन विद्यार्थी हे हेरॉईन हा अमली पदार्थ घेतात. गेल्या काही वर्षांपासून ‘एमडी’ म्हणजेच ‘म्याऊ म्याऊ ’ हा अमली पदार्थ प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

अमली पदार्थाचा तिसरा ग्राहक ठरत आहे, तो एपीएमसी मार्केटमधील कामगार वर्ग. या ठिकाणी देशभरातून ट्रकचालक व त्यांचे मदतनीस येत असतात. अनेकदा येताना ते बरोबर व्यसन घेऊन येतात, तर अनेकदा व्यसनी होऊन परततात.

तुर्भे येथे एकाच आरोपी महिलेस गांजा विक्रीप्रकरणी दोन वेळा अटक करण्यात आली होती, तर तीन वर्षांत एकूण ९२ जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कठोर अंमलबजावणीची गरज

बहुतांश देशांत अमली पदार्थ खरेदी-विक्री वितरणप्रकरणी जर आरोपी सापडला तर त्याचे सुटणे अशक्यप्राय ठरते, मात्र आपल्याकडे तेवढे कडक धोरण नसल्याची खंत अनेकदा पोलीस खासगीत बोलून दाखवतात. कायदा कठोर हवाच, शिवाय त्याची अंमलबजावणीही कठोर करण्याची गरज आहे.

अमली पदार्थ विरोधात आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. यापुढेही अशा कारवाई चालत राहणार आहेत. यासाठी पोलिसांना निश्चितच सामान्य नागरिकांचीही मदत लागणार आहे.    – रवींद्र बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली विरोधी पथक