नवी मुंबई : नवी मुंबईतील उलवे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने मित्रांसोबत घरीच मद्य पार्टी केली. पार्टी झाल्यावर मित्र त्याच्याच घरी झोपला. मात्र काही वेळाने जाग आल्यावर त्याव्यक्तीला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले आणि मित्रही निघून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे झालेली चोरी त्यानेच केली असा आरोप करीत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
उलवे येथे राहणारे शुभजोती सेनगुप्तां यांच्या समवेत हा प्रकार घडला आहे. शुभजोती आणि त्यांचा मित्र कृष्णा ठाकूर यांनी १८ तारखेला शुभजोती यांच्या घरी पार्टी केली. पार्टी झाल्यावर सहज म्हणून शुभजोती यांनी घरातील दागिने कृष्णा याला दाखवले व पुन्हा कपाटात ठेवून दिले. रात्र जास्त झाल्याने कृष्णा तिथेच झोपला. मात्र त्याने शुभजोती यांना शयन कक्षात झोपा मी बैठकीत झोपतो असे सांगितले. त्यामुळे शुभजोती हे शयन कक्षात झोपले तर कृष्णा बैठकीत झोपला.
आणखी वाचा- कार्यालयात आला आणि सर्वांची नजर चुकवून १० लॅपटॉप चोरी करून निघून गेला
काही वेळाने शुभजोती यांना जाग आली त्यावेळी कृष्णा घरात नसल्याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी शोधले असता कृष्णा आढळून आला नाही आणि घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शुभजोती यांनी दागिने जागेवर आहेत का हे पहिले असता दागिने चोरी झाल्याचे समोर आले. एकूण २ लाख १५ हजार रुपयांचे दागिने चोरी झाले होते. घरात दोघांच्या शिवाय कोणी नसणे आणि घटना घडल्यावर कृष्णा आढळून न येणे त्यामुळे चोरी कृष्णाने केली असल्याची खात्री शिवजोती यांना झाली. याबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी कृष्णा यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.