Panvel to Thane Local train Affected: नवी मुंबईच्या नेरूळ स्थानकावर ओव्हर हेड वायरमध्ये समस्या उद्भवल्यामुळे ठाणे ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. मात्र सकाळी ६.५५ वाजता लोकल सेवा पूर्ववत केल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरीही लोकल उशीराने धावत असल्याची तक्रार काही प्रवाशी एक्स या समाज माध्यमावर करत आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेने मध्य रेल्वेच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. पहाटे ४.५५ मिनिटांनी नेरूळ स्थानकाच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ओव्हर हेड वायरमध्ये समस्या उद्भवली होती. त्यामुळे ठाणे-पनवेल-वाशी मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा बाधित झाली होती.
यानंतर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी दुसरी पोस्ट टाकत तांत्रिक समस्या दूर केली असून लोकल सेवा सकाळी ६.५५ मिनिटांनी पूर्वरत झाल्याचे म्हटले. मात्र अद्यापही लोकल सेवा पूर्वीसारखी सुरळीत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
काही प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर बराच वेल लोकल न आल्यामुळे झालेली गर्दी फोटोच्या माध्यमातून दाखविली आहे. ट्रान्स हार्बर आणि हार्बर लोकल सेवेचा वापर दररोज एक दशलक्ष प्रवाशी करत असतात. पनवेल आणि नवी मुंबईतून ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी या लोकल सेवेचा पर्याय येथील नागरिकांना उपलब्ध आहे. सदर प्रवास करण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करणे हे खूप खर्चिक आणि वेळखाऊ असल्यामुळे प्रवाशी हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर अवलंबून आहेत. अशावेळी या मार्गावर काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास प्रवाशांचा खोळंबा होतो.