उरण : अटल सेतू आणि उरण नेरुळ लोकलमुळे मुंबईचे नवे उपनगर बनलेल्या उरणच्या द्रोणागिरी नोड मधील उंच इमारतींना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त असून या इमारतींना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ सिडकोच्या पाणी पुरवठा विभागावर आली आहे.
द्रोणागिरी नोड झपाट्याने विकसित होत आहे. या नव्या शहराला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. या वसाहतीला पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोकडून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र ही जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे द्रोणागिरी नोड परिसरातील पाणी पुरवठ्याला पुरेसा दाब नसल्याने पंधरा किंवा त्या ॉपेक्षा अधिक उंचीच्या इमारतीना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. येथील सेक्टर ४७ आणि ४८ मध्ये उंच इमारती आहेत. त्यांना गेल्या दोन वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामध्ये अक्षर इस्टोनिया इमारतीच्या नागरिकांनी पाण्यासाठी २०२२ मध्ये आंदोलन केले होते.
गेल्या सहा महिन्यांपासून पुन्हा एकदा या टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यानंतर सिडकोने अधिकचा पाणी पुरवठा आणि टँकर नेही पाणी सुरू करण्याचे आश्वासन सिडको कडून देण्यात आला आहे. या संदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना संदेश पाठवून प्रतिक्रिया मागितली असता त्यांच्याकडून प्रतिसाद नव्हता