नवी मुंबई : दुसरा शनिवार,रविवार, मंगळवार आणि बुधवार अशा सलग सुट्ट्या आल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणेकर मोठ्या प्रमाणावर बाहेर जात आहे. कुणी पर्यटन कुणी देवधर्म तर कुणी गावी जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. अनेकांनी सोमवारी रजा टाकून मुंबई बाहेरचा रस्ता धरला आहे. त्यामुळे दिवाळी, गणपती किंवा होळीप्रमाणे प्रत्येक बस थांब्यावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
सलग सुट्ट्यांमुळे बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक प्रवासी कोकण पट्टा आणि गोव्याकडे जाणारे असून त्या खालोखाल महाबळेश्वर, तुळजापूर पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आहे. या शिवाय मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आपापल्या गावी नातेवाईकांच्या भेटी किंवा गावी चार दिवस निवांत क्षण घालवण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आहे. अशी माहिती खाजगी ट्रॅव्हल्स आणि राज्य परिवहन आगाऊ तिकीट काढणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली.
हेही वाचा – खारलँडच्या दुर्लक्षामुळे बंदिस्ती फुटली, उरणच्या शेकडो एकर भात शेतीत समुद्राचे पाणी
खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांचे चांगभले तर प्रादेशिक परिवहन विभागाचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव याही वेळेस प्रवाशांना येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांचे बहुतांश सर्व बुकिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने खाजगी ट्रॅव्हल्सकडे सामान्यांची पावले वळत आहेत. मात्र खाजगी प्रवासी वाहतुकदारांनी तिकीट दरात दिडपट ते दुप्पट वाढ केली आहे.
तुळजापूर राज्य परिवाहनचे मुंबई ते तुळजापूर आठशेच्या घरात तिकीट आहे तर खाजगी ट्रॅव्हल्सचे सध्या सतराशेपर्यंत दर आहेत. सोलापूरचे ६५० ते ८०० पर्यंतच्या तिकिटासाठी तेराशे ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. असेच इतर ठिकाणचेही आहे, अशी माहिती अमर देशपांडे या प्रवाशाने दिली.
हेही वाचा – पनवेल : खांदेश्वर वसाहतीमध्ये खड्डे पुजनानंतर तातडीने खड्डे बुजवले
खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या तिकीट दरावर नियंत्रण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आहे. मात्र त्यांनी कधी लक्ष दिल्याचे ऐकिवात नाही, अशी खंत रेणुका सुलाखे यांनी व्यक्त केली. या बाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाला विचारणा केली असता “आमच्याकडे तक्रार आली नाही, तक्रार आल्यावर कार्यवाही केली जाईल”, असे उत्तर देण्यात आले.