नवी मुंबई: दिवाळी सुट्ट्यांमुळे राज्यात सर्वच ठिकाणी रक्त तुटवडा जाणवत आहे. निगेटिव्ह ग्रुपचे रक्त जवळपास संपल्यात जमा आहे. याची गांभीर्याने दखल घेत नियमित रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्यांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. खास करून मुंबई, नवी मुंबई परिसरांतील रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर रक्त तुटवडा जाणवत आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत असून त्यांच्या नातेवाईकांची सतत धावपळ होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजसेवा भावनेतून रुग्णसेवा करणाऱ्यांना आता बहुतांश फोन हे रक्त मागणीसाठी खणखणत आहेत. राज्यभरातील रक्तसाठा केवळ २५ हजार युनिट शिल्लक असून हा साठा आठ-दहा दिवस पुरेल एवढा आहे. मात्र मुळातच रक्त तुटवडा असल्याने रक्तसाठा कधीही संपू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हीच अवस्था मुंबई परिसराची (एमएमआरडीए) असून मुंबई क्षेत्रात या परिसरात ४ हजार २८० युनिट्स शिल्लक आहे.

हेही वाचा… आठ वर्षांच्या अडथळ्यानंतर नवी मुंबईतील जुन्या सांस्कृतिक-सामाजिक संस्था पुन्हा एकाच छताखाली येणार

यात ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाची केवळ ९८ युनिट्स शिल्लक आहे तर सर्वात कमी एबी निगेटिव्हचे केवळ ३१ युनिट्स शिल्लक आहेत. प्रत्येक वेळी सुट्यांमध्ये ही परिस्थिती उद्भवते. सुट्ट्यांत रक्तदाते मिळत नाहीत. अनेक रक्तपेढ्यांमध्ये अडवणूक अथवा अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते, तर अनेक ठिकाणी स्वत:हून मदतीचे हात पुढे येतात असे अनुभव रक्तासाठी धावपळ करणाऱ्या अनेकांनी सांगितले. कर्करुणांवरील उपचारादरम्यान रक्ताची सर्वाधिक गरज भासते.

हेही वाचा… वाढीव वितरणासाठी जलबोगदे; सिडको वसाहतींच्या भविष्यातील पाण्याची गरज भागणार; तीन हजार कोटींची योजना

दरम्यान, एमएमआरडीए क्षेत्रात ३० पेक्षा अधिक कर्करोगावर उपचार करणारी रुग्णालये असून त्यांना रोज किमान ६० ते ७० प्लेटलेट्स (आर.डी.पी. आणि एस.डी.पी.मिळून) लागतात आणि सध्या केवळ शिल्लक आहेत त्या ७८१ युनिट्स त्यात एसडीपी केवळ ५८ युनिट्स शिल्लक आहे.
याबाबत अनेक रुग्णालयांतील रक्तपेढीशी संपर्क साधला, मात्र नेमका रक्तसाठा किती आहे हे सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.

रक्तदान शिबिराला सर्वाधिक प्रतिसाद राजकीय नेत्यांचा मिळत असतो. मात्र सुट्ट्यांच्या दरम्यान राजकीय नेते मंडळीही रक्तदान शिबिरांचे फार क्वचित आयोजित करतात. याचा फटका निश्चितच रुग्णांना बसतो. – प्रसाद अग्निहोत्री, रुग्णसेवक

सुट्ट्यांत तुटवडा जाणवतो हे माहिती असल्याने याबाबत एक बैठक झाली. त्यात रक्तदान शिबीर आयोजकांना जास्तीत जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. आताही आम्ही पुन्हा हेच आवाहन करीत आहोत. नोव्हेंबरच्या अखरेपर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा आहे. – डॉ. महेंद्र केंद्रे, मुख्याधिकारी, राज्य रक्त संक्रमण परिषद

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to diwali holidays there is a massive shortage of blood in hospitals in the navi mumbai and mumbai area dvr
Show comments