उरण : एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढू लागला असून यामध्ये वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. याचा फटका सरपटणाऱ्या प्राण्यांना बसू लागला आहे. त्यामुळे या प्राण्यांनी आता रहिवासी आणि नागरी वस्तीकडे शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी अनेक घरांच्या परिसरात विषारी आणि बिनविषारी जातींचे सर्प व प्राणी आढळू लागले आहेत. बुधवारी एक पाच फुटी नाग एका घराच्या परिसरात शिरला होता. त्याला सर्पमित्रांनी पकडून वाचविला आहे.
उरणच्या डोंगरी आणि जंगल परिसरात मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यासाठी डोंगर उद्ध्वस्त केले जात आहेत. त्यासाठी या जंगलात आगी लावण्यात येत आहेत. या आगीतही जंगलात अदिवास असलेल्या सरपटणाऱ्या प्राण्यांची होरपळ होण्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे औद्याोगिक विकासात मातीचा भराव करण्यासाठी डोंगरातील माती काढली जात आहे. या मातीच्या भरावातही या प्राण्यांचे अधिवास नष्ट केले जात आहेत. तर यातील अनेक प्राणी हे मातीतून शहर किंवा गावाच्या ठिकाणी जात आहेत. हेच प्राणी अनेक घरांच्या परिसरात येऊ लागले आहेत.
हेही वाचा…नियमावली तयार करण्यासाठी समिती, समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त; रात्रीची यंत्रांची धडधड
सर्पमित्र आपला जीव धोक्यात टाकून नागरी वस्तीत येणाऱ्या विषारी आणि बिनविषारी प्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये ही जागृती निर्माण झाली आहे. सर्पमित्रांमुळे वन्यजीवांचे प्राण वाचतात, असे अनेकांनी सांगितले.