राज्य शासनाकडे हस्तांतरासाठी प्रयत्न सुरू
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे दिघा येथील रेल्वे धरणाची सद्यस्थिती काहीशी चिंताजनक असून या धरणाची डागडुजी व भोवताली तारेचे कुंपण घालण्याची परवानगी नवी मुंबई पालिकेने मागितली होती. पण मध्य रेल्वेने ती परवानगी नाकारल्याने आता या पालिकेच्या दुर्लक्षामुळे हे धरण बेवारस अवस्थेत आहे. दरम्यान, या धरण परिसरात सामाजिक वनीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी हे धरण हस्तांतर करण्याचे प्रयत्न देखील शासनाकडून सुरू आहेत.
ब्रिटिश काळात सुरू झालेल्या बोरीबंदर ते ठाणे रेल्वेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी दिघा येथील पारसिक डोंगराच्या कुशीत रेल्वेने हे धरण बांधलेले आहे. सुमारे पंधरा दशलक्ष पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या धरणाकडे मध्य रेल्वे व वनविभागाचे म्हणावे तसे लक्ष नाही. त्यामुळे धरणात पावसाळ्यात जमा होणाऱ्या पाण्याचा उपयोग होत नाही. या धरणाच्या खाली बेकायेदशीर वसाहती उभ्या राहिल्याने दोन लाखापर्यंत लोकवस्ती या भागात वसलेली आहे. मध्य रेल्वेने हे धरण पालिकेला हस्तांतरित केल्यास या भागातील औद्योगिक व नागरी वसाहतीला या धरणातील पाण्यावर प्रक्रिया करून पुरवठा करण्यासारखे असल्याचे पालिकेने रेल्वेला कळविले होते. पण रेल्वेला त्याबाबत काहीही सोयरसुतक नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे किमान या धरणाची सुरक्षा राखण्यासाठी वरच्या भागातील डागडुजी व रहिवाशांनी या धरणात जाऊ नये, यासाठी तारेचे कुंपण घालण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे.
धरणाची सुरक्षितता गरजेची
या धरणाच्या आजूबाजूची जमीन वनविभागाची असल्याने या भागात मोठय़ा प्रमाणात वनीकरण करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी लागणारे पाणी या धरणातूनच वापरता येणार असल्याने आता राज्य शासन पातळीवर या धरणाचे हस्तांतरण शासनाकडे करण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्यापूर्वी या धरणाच्या सुरक्षतेकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
हे धरण पालिकेला मिळावे, यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आलेले आहेत. पण मध्य रेल्वे पालिकेला हे धरण देण्यास तयार नाही. या धरणाच्या सुरक्षतेविषयी वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर मध्य रेल्वे या धरणाची पाहणी करते व काही डागडुजीही करते. पण या धरणाची कायमस्वरुपी काळजी घेतली जात नाही. ती घेण्याची क्षमता पालिकेची असून या धरणातील पाण्याचा उपयोग होणेदेखील आवश्यक आहे.
-संजय देसाई, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई पालिका.