उरण : तालुक्यातील पूर्व विभागाला अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या नव्या वीजवाहिनीचे काम करणारा कंत्राटदार काम सोडून गेला आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी होणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. उरणमधील १७ गावांना सुरळीत विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीकडून कोट्यवधी रुपये खर्च करून खोपटे खाडी पूल ते उरण या मार्गाने नव्याने विद्युतवाहिन्या टाकण्याचे काम सुरू होते. मात्र या कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने हे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे.

उरण पूर्व विभागातील खोपटा, कोप्रोली, पिरकोन, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना तसेच व्यावसायिक, गोदामांना महावितरणच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, भेडखळ ग्रामपंचायत हद्दीतील खाडीतून येणारी विद्युतवाहक केबल सातत्याने तुटत असल्याने तसेच पावसाळ्यात त्यामध्ये बिघाड होत असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना भर पावसात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच खाडीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक ही त्रस्त आहेत.

हा नाहक त्रास रहिवाशासह व्यावसायिकांना सहन करावा लागत असल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून नव्याने सुरळीत विद्युत जोडणीचे काम करण्याची मागणी केली आहे. या कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने महावितरण कंपनीच्या देखरेखीखाली विद्युत जोडणीचे काम सुरूही केले होते. मात्र, करोडोंचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने भेडखळ ग्रामपंचायत हद्दीतील कोस्टल रोडवरच विद्युत जोडण्याचे काम अर्धवट राहिले आहे.

उरण पूर्व विभागाला अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून नव्याने विद्युत जोडण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. सध्या हे काम करणाऱ्या ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे. मात्र नव्या ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे. जयदीप नानोटे, अतिरिक्त अभियंता, महावितरण