मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने भाज्यांना फटका बसला आहेच आता पावसामुळे भिजलेला कांदा ही सडला असून सडलेल्या खराब कांदा फेकून देण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर ओढवली आहे. आज शनिवारी एपीएमसी बाजारात दुपारनंतर मोठ्या प्रमाणात खराब झालेला कांदा बाजार आवारात फेकून देण्यात आलेला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींची आर्थिक कोंडी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारात शनीवारी पावसामुळे ७८ गाड्यांची अवाक झाली होती. मात्र बहुतांश वाहनांत भिजलेला कांदा आला होता. भिजलेला ओला कांदा लगेच सडतो त्यामुळे ,ग्राहकांनी ही भिजलेला कांदा खरेदीला पाठ दाखविली. त्यामुळे या कांद्याला ग्राहक नसल्याने १०० गोणी म्हणजे जवळपास साडेपाच टन कांदा खराब झाला असून ग्राहक नसल्याने तो फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे. आज दाखल झालेल्या कांद्यामध्ये बहुतांशी कांदा खराब होता त्यामुळे बाजारात सर्वात उत्तम दर्जा असलेल्या कांद्याला १५ ते १६ रू प्रतिकीलो तर मध्यम आणि सर्वसाधारण कांद्याला ५ ते १० रू प्रतिकिलो दराने विक्री झाली आहे.
चाळीतला साठवणूकीचा कांदा होतोय खराब
एपीएमसी बाजारात सध्या २० ते ३० टक्के भिजलेला कांदा दाखल होत आहे, मात्र हा भिजलेला कांदा चाळीतील साठवणुकीचा कांदा आहे. यंदा गरमीमध्ये उत्पादन काढले होते. त्यामुळे गरमीने आधीच कांदा खराब झाला आहे त्यात आणखीन पावसाने भिजलेल्याने अधिक खराब होत आहे. यावर्षी साठवणूकीच्या जुन्या कांद्याचा दर्जा खालावला आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.