उरण: ‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ या सुप्रसिद्ध कवितेतील वर्णनानुसार उरणमध्ये श्रावण सरी कोसळत आहेत. या अचानक ऊन आणि क्षणात वातावरणात बदल होते येणारा जोरदार पाऊस यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.
मागील अनेक वर्षातील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना म्हणून यावर्षीचा पावसाळ्यातील ऑगस्ट पावसाविनाच सरण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे पाणी टंचाईच्या संकटाची ही टांगती तलवार नागरिकांवर येऊ घातली आहे. मात्र दोन तीन दिवस उरण तालुक्यातील अनेक ठिकाणी सकाळी व काहीप्रमाणात सायंकाळी पावसाच्या तुरळक सरी शिडकावा करीत आहेत. तर गुरुवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण निर्माण होऊन काही मिनिटातच रखरखीत उन्हाचे चटके बसत आहेत. या सातत्यपूर्ण बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.