महाराष्ट्रसह वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांसह व्यापारी यांच्यासह अन्य बाजार घटकांनी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. दरम्यान एपीएमसीमधील पाचही बाजारात कडकडीत बंद ठेवण्यात आला. या संपाला सर्वांनी पाठींबा देत बाजार पूर्णतः बंद ठेवला. त्यामुळे नित्याचे होणारे व्यवहार, उलाढाल आज पूर्णपणे बंदच होते. व्यवहार १००% ठप्प होता.
माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्यांतर्गत प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्याकडे नवीन सरकार दुर्लक्ष करत असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा एकदिवसीय राज्यव्यापी संप पुकारला होता. एपीएमसी बाजार हे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या बाजरपेठेत नेहमीच २५-३० कोटींची आर्थिक उलाढाल होत असते. परंतु, आज लाक्षणिक बंदने सर्वच व्यवहार, व्यवसाय ठप्प होता.
एपीएमसी बाजारात कांदा बटाटा, भाजीपाला, फळबाजार, मसाला, धान्य या पाचही बाजारात दररोज हजारहून अधिक गाड्यांची नोंद होत असते. त्यामध्ये भाजीपाला बाजारात अधिक शेतमाल नित्याने दाखल होत असतो. भाजीपालाच्या ६०० हून अधिक, तर फळबाजारात ५०० गाड्या दाखल होत असतात. मात्र, आज बुधवारी बाजार पूर्णपणे बंद असल्याने एकही गाडी बाजारात दाखल झाली नव्हती. भाजीपाला बाजारात मध्यरात्रीपासूनच सुरू होणारे व्यवहार आज मात्र पूर्ण ठप्प होते.
बाजार परिसरात दररोज दिसणाऱ्या मोठ्या वाहनांच्या रांगा आज दिसेनाशा झाल्या होत्या. बाजर पूर्ण बंद असल्याने प्रत्येक बजाराचे मुख्य प्रवेशद्वारही बंदच ठेवण्यात आले होते. त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या बाजार परिसरात आज मात्र शुकशुकाट पहावयास मिळाला. या बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा पहारा देखील तैनात होता. बाजार, आवारातील रस्त्यावर देखील शांतता होती.
वजनकाट्यांवरील माथाडी कामगार संपात
लोखंडाची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळंबोली येथील लोखंड व पोलाद बाजारामधील ६ मुख्य वजनकाट्यांवरील माथाडी कामगार संपात सामिल झाल्याने बुधवारी पुकारलेला लाक्षणिक संप कळंबोली परिसरात सकाळच्या पहिल्या सत्रात यशस्वी झाला आहे. माथाडी कामगारांच्या अनेक टोळ्या कळंबोली परिसरात लोखंड व पोलाद उचलण्याचे काम करतात. या संपात ज्या गोदाम मालकांचे स्वत:चे वजनकाटे आहेत आणि ज्या ठिकाणी कंत्राटी तत्वांवर माथाडी कामगार काम करतात, अशा माथाडी कामगारांच्या टोळ्या मात्र संपात सामिल झाले नव्हते.