पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने दोन कोटी चाळीस लाख रुपये किमतीची दोन अत्याधुनिक वाहने खरेदी केली होती. या वाहनांतून सध्या उन्हाळ्यात रस्त्याजवळील झाडांना पाणी देण्यासोबत हवेतील धूळ नियंत्रण केले जात आहे. पहिल्यांदाच अशापद्धतीने धूळ नियंत्रण केले जात असल्याने रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले आहे. रहिवाशांना स्वच्छ हवेसोबत रस्त्यालगतच्या झाडांवर बसलेली धूळ जमिनीवर बसत असल्याने झाडांनाही मोकळा श्वास घ्यायला मिळत असल्याचे चित्र आहे.
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पनवेल शहराचा समावेश नसला तरी मुंबई महानगर प्रदेशात सर्वाधिक दळणवळण आणि विकसनशील शहरात पनवेल महापालिका क्षेत्र असल्याने पनवेल महापालिका प्रशासनाचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी तब्बल दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक धूळ नियंत्रण करण्यासाठी वाहने खरेदी केली होती.
हेही वाचा – पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
या वाहनातून पाण्याचे तुशार हवेत वेगाने फेकल्याने त्या परिसरातील ठराविक उंचीवरील धूळ जमिनीवर बसेल. दिवसभरात एक वाहन ८० किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यालगतच्या परिसरात धूळ नियंत्रण करणार आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने खरेदी केलेली ही वाहने सध्या पालिकेच्या ताफ्यात कार्यान्वित झाली आहेत.
विशेष म्हणजे या वाहनातून हवा शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे पाणी हे महापालिकेच्या उदंचन केंद्रातून शुद्धीकरण केलेले असल्याने हवा शुद्धीकरणासाठी पालिका प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करत असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अपव्यय पालिका टाळत आहे.
या वाहनातील डिझेल इंधनाचा खर्च पालिका करणार आहे. उन्हाळ्यातील चढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे या वाहनातून रस्त्यालगत उडणाऱ्या पाण्याचे तुशार हवेतील धूळ नियंत्रण करत आहेत. मात्र रस्त्यालगतच्या परिसरात थंडावा राहत असल्याने रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत.
नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी आणि हवेची गुणवत्ता सुधारावी याकरिता पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी धूळ नियंत्रण वाहने खरेदी करण्याचा दूरदृष्टीने निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सध्या या वाहनातून धूळ नियंत्रण केले जात आहे. – डॉ. वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महापालिका