लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : राज्य महामार्ग असणाऱ्या उरण पनवेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने वाहनांमुळे खड्ड्यातील धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचा पावसाळ्यानंतरही होणारा त्रास कधी संपणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

उरण-पनवेल या राज्य महामार्गावरील बोकडवीरा ते नवघर फाटा हा चार किलोमीटरचा मार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या मार्गाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सिडकोची आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ‘लोकसत्ता’ने वारंवार खड्ड्यांचे वृत्त दिल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली.

आणखी वाचा-झाडांवर खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे, नवी मुंबई महापालिकेची ४० जणांना नोटीस

मात्र त्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेली खडी उखडू लागली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खडखडाट कधी बंद होणार याची प्रतीक्षा वाहनचालकाना लागली आहे. खडीच्या वाहतुकीमुळे तसेच रस्त्याच्या कामाने उरण पनवेल रस्त्यावर त्याची धूळ निर्माण होत असल्याने जासई ते गव्हाण फाटा दरम्यानच्या मार्गावर धुळींचे लोट पसरू लागले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना या ‘धूळ’वडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उरण – पनवेल मार्गावरून ये-जा करणाऱ्या जड वाहनांमुळे प्रचंड धुरळा निर्माण होऊ लागला आहे. या वाढत्या धुरळ्यामुळे हवेतील धुळीकणात वाढ झाली आहे. त्यामुळे हवा ही प्रदूषित झाली आहे. उरणमधील राष्ट्रीय, राज्य व गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली खडी, आणि सिमेंट तर काही खड्डे चक्क मातीने भरण्यात आले होते. त्यामुळे खड्ड्यांत पाणी सुकल्याने त्याची धूळ निर्माण होऊ लागली आहे. या खड्ड्यांतून वेगाने वाहने जात असताना धूळ उडू लागली असून ती दुचाकीवरून तसेच एस. टी. या सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये उरण-पनवेल मार्ग, जासई ते गव्हाण, खोपटा-कोप्रोली मार्ग, दास्तान ते दिघोडे आदी मार्गावर धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहन चालकांना श्वसनाच्या आजारांचाही सामना करण्याची वेळ आली आहे.

आणखी वाचा-शीव पनवेल महामार्गावर तेलाचा कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी

प्रदूषणात भर

खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणारी खडी उखडू लागल्याने धूळ निर्माण होत आहे. परिणामी धुरळा निर्माण होऊन हवेतील धुलिकणातही वाढ झाली आहे. प्रवासी, वाहनचालकांना या धुलिकणांमुळे श्वासनाचा त्रास होण्याची शक्यता आहे.