उरण : उरण न्यायालयात सोमवारी ई- फाईलिंग सुविधा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना व निर्देशानुसार रायगड जिल्हा व इतर ठिकाणच्या न्यायालयातील कारभार पेपरलेस करण्यात येणार आहे. त्यानुसार उरण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये ई-फाईलींग सुविधा कार्यप्रणालीचे उद्घाटन प्रमुख न्यायाधीश विकास बडे व न्यायाधीश निलेश वाली यांच्या हस्ते करण्यात आले.
ई-फाईलिंग अँड फॅसिलिटी सेवा वकील व पक्षकार या दोन्हींसाठी उपयोगी पडणार असून आता दाखल होणारी नवीन प्रकरणे (खटले, दावे) ऑनलाईन पद्धतीने दाखल करावी लागतील. यासाठी लागणारे साहित्य जसे संगणक, स्कॅनर, प्रिंटर, वेब कॅमेरा व इतर उपकरणे बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडून पुरवण्यात आली आहेत. तसेच या ई-फाईलिंग अँड फॅसिलिटी सुविधा केंद्रात वकील व पक्षकार यांच्या मदतीकरीता संगणक परीचालकाचीसुद्धा नियुक्ती करण्यात येणार आहे.
हेही वाचा – उरण मध्ये दहीहंडीचे लाखोंचे थर; राजकीय पक्षांच्याही हंड्या सज्ज
हेही वाचा – उरण ते अलिबाग दुचाकीवर जलमार्गाने प्रवास, ३० ते ४० किलोमीटर रस्ते प्रवासापासून सुटका
ई- फाईलिंगचे काम वाजवी दरात करण्यात येणार असल्याची माहिती उरण वकील संघटनेचे अध्यक्ष अँड दत्तात्रेय नवाळे यांनी दिली. यावेळी अॅड. एम. एम. मोकल, अॅड. विजय पाटील, अॅड. पराग म्हात्रे, अॅड प्रसाद पाटील व अॅड. किशोर ठाकूर, अॅड. सागर कडू, अॅड. संतोष पाटील आदीजण उपस्थित होते.