ठाणे-बेलापूर मार्गावर नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या ई-प्रसाधनगृह नाण्यांचा डबा चोरीला गेल्याची घटना घडली. ई-प्रसाधनगृहात अस्वच्छतेमुळे दरुगधी पसरल्याने नागरिकांनी पाठ फिरवली आहे.
‘स्मार्टसिटी’अंतर्गत पालिकेने काही महिन्यांपूर्वी ठाणे-बेलापूर मार्गावर महापेजवळ पहिले ई-प्रसाधनगृह उभारले. मार्गावर नऊ ठिकाणी लाखो रुपये खर्चून ई-प्रसाधनगृहे उभारली आहेत. पावणे उड्डाणपूल, महापे स्कॉयवॉक, एमआयडीसी कार्यालय, रिलायन्स कंपनी, तळवली नाका, रबाळे पोलीस ठाणे, सीमेन्स कंपनी आणि उरण जंक्शन अशा ठिकाणी ई-प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत.
प्रसाधनगृह उभारल्यानंतर त्याच्या सुरक्षेचे काय, या प्रश्नाचा मात्र पालिकेने विचार केला नसल्याचे दिसून येत आहे. एक, दोन वा पाच रुपयांची नाणी टाकून प्रसाधनगृहाचा वापर नागरिकांना करता येतो. प्रसाधनगृहात पाणी आणि दिव्याची सुविधा रात्री वेळी बंद होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ई-प्रसाधनगृहाची स्वच्छता नीट पाहिली जात नाही. त्यामुळे काही वेळाने वापरण्यायोग्य स्थिती राहत नाही, अशी माहिती काही वाहनचालकांनी दिली. ई-प्रसाधनगृहाचा दरवाजा नाणे टाकल्यानंतर काहीवेळ उघडत नाही. अशा प्रसंगी महिलांची मोठी कुंचबणा होत आहे.
ई-प्रसाधनगृहात स्वच्छता नसते वा नाण्यांचा डबा चोरीला गेल्याच्या घटना खऱ्या आहेत. यापुढे विभाग अधिकांऱ्यानी प्रसाधनगृहाच्या देखभालीकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पुढील काळात खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रसाधनगृहासाठी सुविधा पुरवण्याचे व देखभालीचे काम देण्यात येणार आहे.
दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका