आठवड्याभरापासून विशेषतः शुक्रवारी राज्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला असून फळभाज्या त्याच बरोबर पालेभाज्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. ऐन पितृपक्ष पंधरावड्यात भाज्यांच्या वाढीने गृहिणींची मात्र चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ४७० गाडी आवक झाली असून त्यापैकी ३९०गाड्या शेतमालाची विक्री झाली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होता. त्यामुळे एपीएमसी बाजारात दाखल होणाऱ्या भाजीपाल्यात घट झाली आहे.
विशेषतः पुणे, नाशिक ते मुंबई कृषि उत्पन्न भाजीपाला बाजारात पावसामुळे राज्यातून दाखल होणाऱ्या पालेभाज्या खराब होत आहेत, त्यामुळे घाऊक बाजारात ही दरवाढ झाली आहे. घाऊक बाजारात नाशिक येथील पालेभाज्या यांचे दर अधिक आहेत . तर त्याचा परिणाम किरकोळीत झाला असून भाज्यांचे दर आवाक्याच्या बाहेर गेले आहेत.एपीएमसी भाजीपाला बाजारात दररोज ५५०ते ६०० भाजीपाल्याच्या गाड्या दाखल होत असतात. आता सध्या बाजारात ४७० गाड्या दाखल झाल्या असून यामध्ये पालेभाज्यांची आवक घटली आहे. बाजारात भाजीपाल्याची ५०% आवक होत असून ४०% उत्पादन कमी झालं आहे. बाजारात दाखल होणाऱ्या पालेभाज्यात अधिक खराब होत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात पालेभाज्यांची दरवाढ झाली आहे. शुक्रवारी बाजारात मेथी,कोथिंबीर यांची १ लाख क्विंटलहुन अधिक आवक झाली होती ते आज शनिवारी ५० हजार क्विंटल इतकी झाली आहे. एकंदरीत पालेभाज्यांची आवक निम्यावर होत आहे. त्याच बरोबर गवार, फरसबी, भेंडी, गाजर, वाटाणा, शेवगा शेंग, शिमला मिरची , तोंडली महागली आहेत.
घाऊक बाजारात पालेभाजी आवक निम्यावर
बाजारात एकूण २३६००० क्विंटल पालेभाजी आवक झालेली आहे. शनिवारी बाजारात कोथिंबीर ८४,४००क्विंटल तर मेथी १३,००० क्विंटल, पालक २६,३००क्विंटल तर शेपू १०,०००क्विंटल दाखल झाल्या आहेत. तेच गुरुवारी बाजारात मेथी, कोथिंबीर १ लाख क्विंटलहुन अधिक आवक होती तर मेथी ५०हजार क्विंटल होती. किरकोळ बाजारात मेथी आणि कोथिंबीरचे प्रमाण तुरळक आढळत असून दरवाढ झाली आहे. एक मेथीची जुडी किरकोळ बाजारात ५०-१००रुपयांवर तर कोथिंबीर मोठी जुडी ६० रुपये तर पालक ही ६० रुपयांनी विकली जाते.
किरकोळीत भाज्यांचे दर गगनाला
कोथिंबीर, मेथी, पालक यांची देखील भाव वाढले आहेत. यामध्ये गृहिणींना जेवणात आवशक्य असणारी कोथिंबीर एक जुडी २० रुपयांवरून ६० रुपयांवर पोहचली आली आहे. तर १५-२० रुपयांनी उपलब्ध असलेली मेथी ५०-१०० रुपयांनी विक्री होत आहे. पालक १०-१८रु असलेला पालक ६० रुपयांनी उपलब्ध आहे. तर भेंडी १६०रु, गावर १२०-१४०रु तर फरसबी १६०-२००रुपयांवर विक्री होत आहे.
हेही वाचा : ‘इंडियन स्वच्छता लीग’ प्रभात फेरीच्या माध्यमातून पनवेलकरांमध्ये स्वच्छतेसाठी जनजागृती
प्रतिकिलो दर
भाज्या किरकोळ दर घाऊक दर
गवार १२०-१६०रु ४०-१००रु
फरसबी १६०-२००रु ५०-८०रु
भेंडी १६०रु ३०-४४रु
फ्लॉवर १२०- १६०रु १६-२०रु
गाजर ८०-१००रु ३०-४४रु
शिमला १२०रु ३०-५०रु
मेथी ५०-१००रु जुडी १८-२४रु जुडी
कोथिंबीर ५०-६०रु जुडी ४०-५०रु
पालक ६० रु जुडी १०-११रु
शेपू २०रु १२-१४रु
एपीएमसीतील पालेभाजी आवक क्विंटल मध्ये
पालेभाजी आवक दि १६ सप्टेंबर दि. १७ सप्टेंबर
मेथी ५०५०० १३०००
कोथिंबीर १३१५०० ८४४००
पालक ११३४०० २६३००
शेपू ३००० १००००