मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात पावसाचा हंगामी फळांना ही फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसाने सीताफळ, डाळींबाचे उत्पादन कमी झाले असून बाजारात आवक ही कमी होत आहे. त्यामुळे दरात १५% ते २०% वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कडे किरकोळ बाजारात वसईच्या वेलची केळीने ही प्रतिकिलो १३० रु असा उचांक गाठला आहे.
हेही वाचा- घाऊक बाजारात तूर, मुगडाळीने गाठली शंभरी! सप्टेंबरमध्ये बाजारात आवक घटली परिणामी डाळींची दरवाढ
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुलैअखेर डाळिंब, सीताफळ हंगामाला सुरुवात होत असते. तर ऑगस्ट महिन्यात या फळाची आवक वाढण्यास सुरुवात होते. तसेच डाळींब, सीताफळ या फळांची आवक ही सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाच्या तडाख्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात या फळांची आवक कमी होत आहे. अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे. बाजारात सिताफळाची आता १० ते १२ गाडी आवक असून आधी २०ते २५ गाडी येत होती तर डाळींबाच्या आधी १५ ते २० गाड्या, तर आता ७ ते ८ गाडी दाखल होत आहेत. सीताफळ, डाळिंब हे पुणे, नगर, सोलापूर, सांगली नाशिक आवक होत आहे.
हेही वाचा- भाज्या कडाडल्या! ; पावसाच्या तडाख्याने पिकहानी : कोथिंबीर जुडी शंभरीपार
किरकोळीत वसईची केळी ही आवाक्याबाहेर
आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या वसई केळीची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु वसई केळीचा मुख्य हंगाम हा दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर मध्ये सुरू होतो. मात्र आता बाजारात वेलची केळीची आवक तुरळक होत असते. पावसाचा तडाखा या केळीच्या उत्पादनाला ही बसला आहे. एपीएमसी बाजारात दररोज ९ ते १० टन केळींची आवक होते, मात्र गेल्या चार ते पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे आवक घटली आहे. सध्या बाजारात दररोज २ ते ३ टन केळी दाखल होत आहेत . घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने ही केळी उपलब्ध आहेत, अशी माहिती व्यापारी संतोष सुर्वे यांनी दिली आहे. तेच किरकोळ बाजारात मात्र दरांनी उच्चांक गाठलेला आहे. किरकोळ बाजारात प्रति डझन ८० ते १०० रुपये तर १२० ते १३० रुपये प्रति किलोने या केळींची विक्री होत आहे. साधारणता किलोमध्ये लहान आकाराची केळी २० ते २५ नग तर मोठ्या आकारांची केळी १४ ते १५ नग येतात.