लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी नवी मुंबईतील ठरावीक बाजारपेठांच्या परिसरात होणारी मोठी कोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी यासंबंधीच्या नियोजनासाठी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे गुरुवारी आयोजन केले आहे. वाशी येथील एपीएमसी बाजारांच्या परिसरात आठवडाभरापासून खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली असून या संपूर्ण परिसरात मोठी कोंडी होताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी पोलिसांची कुमक वाढविण्याची आखणी केली जाणार आहे.
नवी मुंबई शहर हे वेगवेगळ्या उपनगरांमध्ये विभागले गेले असले तरी सणासुदीच्या काळात येथील ठरावीक उपनगरांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडते असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. वाशी येथील एपीएमसी परिसरातील मसाला तसेच धान्य बाजारात दिवाळी खरेदीसाठी संपूर्ण मुंबई महानगर पट्ट्यातून ग्राहक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी अभूतपूर्व अशी कोंडी झालेली पाहायला मिळते. या वाहतूक कोंडीचा भार वाशी येथील अरेंजा कॉर्नर चौक तसेच सतरा प्लाझा येथील मुख्य मार्गावरही येतो. याशिवाय वाशी सेक्टर नऊ, सतरा प्लाझा परिसर, सीवूड्स येथील रेल्वे स्थानक मॉल परिसर, वाशी येथील रेल्वे स्थानक भागातील व्यापारी संकुले अशा ठिकाणीदेखील वाहनांची मोठी गर्दी होत असते. दिवाळीच्या कालावधीत वाशी, कोपरखैरणे यांसारख्या उपनगरांमध्ये एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जाण्यासाठी या कोंडीमुळे मोठा कालावधी लागतो. हे होत असताना वाहतूक पोलिसांचे कोणतेही ठोस असे नियोजन या भागात नसते असा पूर्वानुभव आहे.
आणखी वाचा-‘अतिक्रमण’ उपायुक्तांची बदली, डॉ. राहुल गेठे यांच्या बदलीवरून महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण
सणासुदीला कोंडीची ठिकाणे
वाशी सेक्टर ९/१०, १५, १६. कोपरखैरणे रा. फ. नाईक चौक, सेक्टर १५ येथील नाका, घणसोली गावठाण, ऐरोली सेक्टर ५, नेरुळ स्टेशन परिसर, पाम बीचलगत पेट्रोल पंप परिसर, शिरवणे गाव, सीबीडी सेक्टर ४ चा परिसर, एपीएमसी बाजारपेठा, वाशी रेल्वे स्थानक परिसर, सीवूड्स मॉल परिसर.
आज बैठक
दरम्यान नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी यंदाच्या वर्षी या कोंडी होणाºया ठिकाणांवर कोणते उपाय आखता येतील यासंबंधीचा सविस्तर अभ्यास सुरू केला आहे, अशी माहिती नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी लोकसत्ताला दिली. यासंबंधीची महत्त्वाची बैठक गुरुवारी घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही चौकांमध्ये पोलीस कर्मचारी वाढविणे तसेच वाशीसारख्या उपनगरांमध्ये वाहतूक सुरळीत होण्यासाठी कोणते उपाय आखता येतील याचाही अभ्यास केला जात आहे.