करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोची (CIDCO) ५७३० घरांची लॉटरी आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी काढण्यात आली. या गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सिडकोचा हा गृहनिर्माण प्रकल्प तळोजा नोडमध्ये उभारण्यात येणार आहे. घर खरेदी करण्यासाठी इच्छुकांना २४ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करता येणार आहे. एकूण ५७३० घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १५२४ घरं उपलब्ध असणार आहेत. उर्वरित ४२०६ घरं साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध असणार आहेत.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या माध्यमातून ५७३० घरांच्या निर्मितीचा शुभारंभ यावर्षीच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येतोय. सिडकोतर्फे सातत्याने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यात येतात. किफायतशीर दर, दर्जेदार बांधकाम आणि पारदर्शक व सुलभ ऑनलाईन प्रक्रियेमुळे सिडकोच्या आजपर्यंतच्या सर्व गृहनिर्माण योजना लोकप्रिय ठरल्यात.”
हेही वाचा : शहरबात- नवी मुंबई : ‘साडेबारा टक्के’चा पेच
“ही गृहनिर्माण योजना ५७३० घरांची आहे. नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या तळोजा भागात ही घरं उपलब्ध करून देण्यात आली. रेल्वे, महामार्ग, नियोजित मेट्रो यामुळे तळोजाला उत्तम कनेक्टिव्हिटी देखील आहे. या योजनेतील एकूण घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १,५२४ घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि उर्वरित ४२०६ घरं सर्वसाधारण प्रवर्गाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.