नवी मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर चार दिवस शांत राहिलेले एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्मथक यांच्या पोस्टरबाजीला नवी मुंबईत सुरुवात झाली आहे. अनेक जणांनी मोक्याच्या जागांवर बेकायदा फलक लावले आहेत तर अद्याप अनेक जण कुंपणावर असल्याने त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.
शिवसेनेचे शहर उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी यांनी आम्ही सैदव तुमच्या सोबत…असा मजकूर असलेले फलक वाशीत लावले आहेत तर ऐरोलीत शिंदे सर्मथकांनी मोक्याच्या जागा काबीज केलेल्या आहेत. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते सध्या विश्रांती घेत आहेत. चार दिवसांपूर्वी शिवाजी चौकात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी आयोजित करण्यात आलेली निर्देशने ऐनवेळी स्थगित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा : बाळासाहेबांच्या पुत्राला संकटसमयी सोडून कसे जाणार? शिवसेना खासदाराचा भावनिक सवाल
एकनाथ शिंदे बंडाचे राज्यातील प्रत्येक क्षेत्रात परिणाम दिसू लागले आहेत. शिवसेना व शिंदेसेना असे उभे दोन तट शिवसेनेत पडले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी चर्चा सुरू केली आहे. नवी मुंबईतील विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर यांच्याशी तीन दिवसांपूर्वी मातोश्रीवर बोलवून संवाद साधला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक शहर व पालिका असलेल्या नवी मुंबईतही शिवसेना व शिंदेसेना अशी दुफळी तयार झाली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या छबीसह आम्ही सैदव आपल्या सोबत असल्याचे फलक वाशी नोडमध्ये लावले आहेत. त्याच वेळी नेरुळ, बेलापूर, येथेही अशा प्रकारे सर्मथक पदाधिकाऱ्यांनी फलकबाजी केली आहे तर ऐरोलीत एका माजी पदाधिकाऱ्याचे कार्यकर्ते प्रमुख जागा काबीज केल्या असून ऐरोली मुलुंड खाडीपुलाच्या सुरुवातीस फलकबाजी केली आहे.
शिंदेंकडूनही पदाधिकाऱ्यांशी संपर्क शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या राज्यातील जिल्हाप्रमुखांशी संपर्क साधत असून त्यांनी नवी मुंबईच्या दक्षिण नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्याशी संपर्क साधला असून शिंदेसेनेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख यांच्या बैठकीला जाऊ नका असा आग्रह शिंदे यांनी मोरे यांना केले पण मोरे यांनी शिंदे यांच्या या आग्रहाला स्पष्ट शब्दात नकार दिला. शिंदे यांनी अनेक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे समजते.