नवी मुंबई :  पैसे मोजण्याची विनंती करून ज्येष्ठ नागरिक महिलेचे दागिने लुटल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. फसवणुकीचे हे नवे तंत्र असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कामोठे येथे एका जेष्ठ नागरिक महिलेची झालेल्या फसवणुकीत तंत्र नवीनच आहे. त्यात फिर्यादी महिलेचा आरोपीवर विश्वास ठेवणे महागात पडल्याचे पोलिसांनी सांगितले. कळंबोली येथे राहणाऱ्या सुनंदा पावसकर या तळोजा एमआयडीसीतील कंपनीत काम करतात. याच कामानिमित्त त्या २९ ऑगस्टला गेल्या होत्या. तळोजातील अभ्युदय बँकेसमोरील बस थांब्यावर बसची वाट पाहत असताना तेथे दोन अनोळखी व्यक्ती आल्या व त्यांनी ‘आमच्या कडे पैशांचे बंडल आहे मात्र आम्हाला पैसे मोजता येत नाही तुम्ही मदत कराल का?’ अशी विचारणा केल्यावर त्यांनी पैसे मोजून देण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, जरा आडोशाला पैसे मोजू कुणी हिसकावून नेईल याची भीती वाटते असे सांगून एक रिक्षा केली व पावसकर यांना सोबत घेत कळंबोली रेल्वे स्टेशन परिसरात आणले.

 जेव्हा पैसे मोजण्याची वेळ आली त्यावेळी १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे बंडल आहे. तुम्ही लांब जाऊन मोजा असे सांगत तुम्ही पैसे घेऊन जाल अशी भीती व्यक्त करीत त्यांच्याकडून ७७ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. पीडित महिला जेव्हा पैसे मोजण्यासाठी कपडय़ात बांधलेले पुडके तिने सोडले त्यावेळी बंडलाच्या केवळ वर आणि खाली नोटा व  आत कागदे असल्याचे निदर्शनास आले. तिने हा प्रकार आरोपींना सांगण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ते पळून गेले होते. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Story img Loader