उरण : एनएमएमटी व्यवस्थापनाने उरणच्या मार्गावर विद्युत बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानुसार मंगळवारपासून उरण ते कोपरखैरणे या मार्गावरील विद्युत बस सुरू झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उकाड्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

उरणमध्ये उरण ते नेरुळ/बेलापूर ही लोकल सेवा सुरू झालीं असली तरी अनेक प्रवासी हे एनएमएमटी बसने प्रवास करीत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बस सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. मात्र उरणमध्ये येणाऱ्या बस या नादुरुस्त व जुन्या आहेत. त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

उरणमधून कोपरखैरणे आणि कळंबोली आशा दोन बस मार्गांवर येथील प्रवासी प्रवास करीत आहेत. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेसची दुरवस्था झालेली आहे. अनेक बस खडाखड आणि बसच्या काचा न लागणे आदी समस्या आहेत.

एनएमएमटी बससेवा ही उरणमधील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत: नवी मुंबईत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. काही महिने बंद असलेली ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मात्र या बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळेही प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील बस संख्येतही वाढ करण्यात यावी त्याचप्रमाणे विद्याुत बस सेवाही सुरू करण्यात यावी अशी मागणी उरणमधील प्रवाशांनी केली होती.

जुईनगर ते कोप्रोली वशेणी ही वातानुकूलित सेवा खोपटे येथील अपघातानंतर बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी केली आहे.

पाठपुराव्यानंतर बससेवा पूर्ववत

एनएमएमटी बससेवा ही शहरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. ही सेवा काही महिने बंद करण्यात आली होती. ही बससेवा सुरू करावी या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, परिवहन विभाग आदींना निवेदनेही देण्यात आली होती. वारंवार मागणी आणि पाठपुरावा केल्यानंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली.