नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विजेचे खांब पडण्याच्या घटना शहरात होत आहेत. शुक्रवारी अपरात्रीही वाशी सेक्टर ७ येथे एक विजेचा खांब पडला असून त्यामुळे एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद झाला आहे. विशेष म्हणजे, सकाळी साडेआठपर्यंत विद्युत विभागाला याची माहितीही नव्हती.
वाशी सेक्टर सात हा भाग फारशी वर्दळ नसलेला आणि उच्चभ्रू वस्तीचा भाग समाजाला जातो. याच ठिकाणी उद्यान आणि कधी काळी सुशोभित केलेला खाडी किनारा असलेले सागर विहार हे स्थळ आहे. त्यामुळे पहाटेपासून मॉर्निंग वॉक करणाऱ्याची संख्या मोठी असते. वाशी डेपोपासून सागर विहारच्या दिशेने जाताना सागर विहारपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकत रात्री विद्युत खांब पडला. सुदैवाने त्याखाली गाडी आली नाही आणि रात्र असल्याने कोणीही व्यक्ती न आल्याने कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. या ठिकाणी खांब रस्त्यावर आडवा पडल्याने मात्र रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. त्यात शहर वाहतूक सेवा असलेल्या एनएमएमटीलाही मार्ग बदलावा लागला. त्यामुळे या परिसरातील बस थांब्याऐवजी अन्यत्र प्रवाशांना उतरून चालत इच्छित स्थळी पायी जावे लागले. शहरात नवीन खांबे बसवण्याचे काम सुरू आहे आणि पडलेला खांब जुना आहे असा दावा विद्युत विभाग करीत असला तरी मान्सूनपूर्व काम करताना धोकादायक खांब शोधून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित होते. असे असताना हा खांब नजरेस कसा पडला नाही. त्यामुळे विद्युत विभागाच्या मान्सूनपूर्व कामावर प्रश्नचिन्ह आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी विकास सोरटे यांनी दिली.
हेही वाचा – नवी मुंबई : शाळा सुरु, शाळाशाळांमध्ये स्वागतोत्सव; मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
याबाबत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील लाड यांना विचारणा केली असता खांब बाजूला करण्याचे काम सुरू आहे. खांब जुना की नव्याने बसवण्यात आलेला आहे याची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
हेही वाचा – नवी मुंबई : सिडको जमिनीवरील अवैध प्रकार, माती चोरी रोखण्याचे प्रयत्न; नागरिकांनाही आवाहन
नेरुळ सेक्टर १६ येथे १५ मार्चला नव्याने बसवलेला विद्युतखांब पडला होता. २१ मार्च रोजी पुन्हा एकदा वंडर्स पार्क जवळ सेक्टर १९ ए, नेरुळ येथे नव्याने बसविण्यात आलेला विद्युत खांब पडला. विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे खांब्याशेजारून जाताना सावध राहावे, अशी स्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.