नवी मुंबई: शहरातील सर्व पोलीस ठाण्यात भंगार अवस्थेतील गाड्या आढळून येतात मात्र एपीएमसी पोलीस ठाण्यात पार्किंगच्या जागेवर हत्तीच्या आकाराएवढी हत्तीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. २०१९ मध्ये एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील एक आलिशान दागिन्यांचे दालन अचानक बंद करण्यात आले. त्याच्या मालकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल होता. मालकाने पोबारा केला मात्र पोलिसांनी याच दालनाबाहेर ठेवण्यात आलेली ही हत्तीची मूर्ती जप्त केली. तेव्हापासून एपीएमसी पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वांचे लक्ष ते वेधते आहे.
शहरातील सर्व पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर भंगार गाड्या दिसून येतात. या गाड्या अपघातातील वा गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या असतात. तसेच चोरी प्रकरणात जप्त केलेल्या गाड्यांचाही यात समावेश असतो. संबंधित खटल्याचा निकाल लागल्याशिवाय सदर गाड्या आहे त्याच अवस्थेत ठेवण्यात येतात. मात्र एपीएमसी पोलीस ठाण्यात गाड्यांच्या सोबत एक हत्तीची मूर्ती देखील आहे. हत्तीच्या आकाराची भली मोठी मूर्ती येथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते.
आणखी वाचा-उरण : खोपटे खाडी पुलाला भलं मोठं भगदाड, वाहन चालकांना धोक्याचा इशारा
एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत सतरा प्लाझा या इमारतीतील गुडवीन नावाचे सोन्याचे दागिन्यांचे मोठे दालन होते. मात्र अचानक ते बंद करण्यात आले. पुढे त्यांच्या संचालक विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. नवी मुंबईतील २१५ जणांची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संचालक दालनाला टाळे लावून पळून गेल्यावर तेथे काहीही ठेवण्यात आले नव्हते, अपवाद एका हत्तीची मूर्ती. तिच मूर्ती पोलिसांनी जप्त करून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये ठेवली आहे. आता या प्रकरणातही न्यायदान झाल्याशिवाय मूर्तीबाबत निर्णय घेता येत नाही. अशी माहिती त्यावेळी एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने दिली.