जयेश सामंत, लोकसत्ता
नवी मुंबई : सिडकोतील ठरावीक उपनगरांना मोरबे धरणातून करावा लागणारा पाण्याचा पुरवठा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणारे अपुरे पाणी यामुळे शहरातील जल वितरण व्यवस्थेत सातत्याने निर्माण होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने यंदाच्या वर्षी प्रक्रियायुक्त पाण्याचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत असलेल्या डेटा सेंटर तसेच इतर कंपन्यांना हे प्रक्रियायुक्त पाणी देता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने एमआयडीसीकडे प्रस्ताव सादर केले असून याशिवाय शहरातील उद्याने तसेच दुभाजकांमधील हरित पट्ट्यांना हे पाणी पुरविण्याची योजना तयार केली आहे.
आणखी वाचा-मोबाईलवर आलेल्या जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात, आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक
नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या उपनगरांना मोरबे धरणातून दिवसाला ५० दशलक्ष लिटरपेक्षा अधिक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत असतो. नवी मुंबई महापालिका हद्दीतील लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून येथील पाण्याची मागणीही या प्रमाणात वाढू लागली आहे. मोरबे धरणाची मालकी असूनही शहरातील काही उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या मानकांनुसार प्रतिव्यक्ती प्रतिदिन किमान १५० लिटर इतका पाण्याचा पुरवठा व्हावा असे अपेक्षित धरण्यात आले आहे. शहरातील काही उपनगरांमध्ये मात्र हे प्रमाण २०० लिटरपेक्षा अधिक असून काही दिघा, घणसोली भागांतील रहिवाशांना जेमतेम १५० ते १६० लिटर इतके पाणी मिळत आहे. सिडको उपनगरांमधील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेने एमआयडीसीकडे मंजूर असलेला ८० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा पूर्ण प्रमाणात मिळावा अशी मागणी लावून धरली आहे. सातत्याने मागणी करूनही एमआयडीसीकडून पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याची महापालिकेची तक्रार आहे.
प्रक्रियायुक्त पाण्याचे नियोजन
सिडको उपनगरांना करावा लागणारा पाण्याचा पुरवठा लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने पाणी वितरणातील कसरती टाळण्यासाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या:स्थितीत कोपरखैरणे आणि ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रातून दिवसाला २० दशलक्ष लिटर इतके प्रक्रियायुक्त पाणी महापालिकेस मिळते. याशिवाय अन्य ठिकाणांहून एकत्रितपणे २० दशलक्ष लिटर असे दिवसाला एकूण ४० दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाण्याचा पुरवठा महापालिकेस होत असतो. यापैकी दिवसाला सात दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीतील उद्याोगांना पुरविले जाते. याशिवाय आणखी १२ दशलक्ष लिटर पाणी हे शहरातील उद्यानांना तसेच काही गृहनिर्माण वसाहतींमधील उद्यानांसाठी पुरविले जाते.
आणखी वाचा-नवी मुंबई : गेले अतिक्रमण हटवण्यास अन् सापडला २० किलो गांजा, एकाला अटक
जवळपास २० दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाण्याचे नियोजन केल्यानंतर उरलेल्या पाण्याला एमआयडीसी भागातून ग्राहक मिळावा यासाठी महापालिकेने नव्याने नियोजन सुरू केले आहे. दिघा आणि महापे भागात उभ्या राहत असलेल्या दोन डेटा सेंटर्सना अनुक्रमे दोन आणि तीन असे एकूण पाच दशलक्ष लिटर पाणी पुरविण्याचा करार अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. यासाठी काही भागांमध्ये जलवाहिन्या टाकण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसी भागातील अधिकाधिक कंपन्यांनी प्रक्रियायुक्त पाणी घ्यावे यासाठी महापालिकेचा प्रयत्न असून यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
उद्यानांना १०० टक्के प्रक्रियायुक्त पाणी
महापालिका क्षेत्रातील उद्यांनाना १०० टक्के या प्रमाणात प्रक्रियायुक्त पाणी देण्याची योजना यंदाच्या वर्षी महापालिकेने आखली आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सद्या:स्थितीत घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली भागांतील काही उद्यानांना या पाण्याचा पुरवठा केला जातो. ठाणे-बेलापूर रस्त्यावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांना प्रक्रियायुक्त पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली जात असून पाम बीच मार्गावरील झाडांना यापूर्वीच हे पाणी दिले जात आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.