नवी मुंबई : नवी मुंबईतील एनआरआय संकुलालगत असलेल्या पाणथळ जागेच्या काही भागावर खासगी विकासकाने अतिक्रमण केले आहे. फ्लेमिंगोच्या अधिवासाचे सर्वात मोठे केंद्र म्हणून ‘डीपीएस’ शाळेमागील या पाणथळ जागेच्या मार्गावर लोंखडी कुंपण टाकून ही जागा खासगी असल्याचे फलक लावण्यात आलेे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
नवी मुंबईतील सीवूड्स भागातील टी. एस. चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव, एनआरआय परिसरातील एनआरआय तलाव आणि डीपीएस तलाव या तीन पाणथळ जागांवर मोठया प्रमाणावर फ्लेमिंगो तसेच दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास दिसून येतो. शासकीय यंत्रणा निवडणुक कामात व्यग्र असताना गेल्या काही दिवसांपासून पाणथळ परिसरात खासगी विकासक तसेच कंत्राटदारांचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. चाणक्य तलावाजवळ कांदळवनावर छुप्या पद्धतीने अतिक्रमण केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय कांदळवनावर ज्वलनशील पदार्थ टाकून ते जाळण्याचे प्रकारही या भागात नित्याचे झाले आहेत. असे असताना एका खासगी विकासकाने तीन दिवसांपासून या भागात जाणारे मार्ग अडवून तेथे ही खासगी मालमत्ता आहे असे फलक लावल्याने तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सिडको प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने विकासाने टाकलेले कुंपण हटविले. सिडको अथवा महापालिकेमार्फत मात्र अतिक्रमणाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
हेही वाचा >>>अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल; मित्रासाठी निवडणूक प्रचार करणे पडले भारी
नवी मुंबईतील एनआरआय संकुलाला लागून असलेल्या एका मोठया पाणथळींच्या पट्टयावर एका उद्याोगपतीकडून बांधकाम प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याठिकाणी पाणथळी नसल्याचे पद्धतशीरपणे ठसविण्याचा प्रयत्न होत आहे. शनिवारी पाणथळ परिसरात जाण्याचा रस्ता बंद करून नागरिकांना रोखण्यात आले. पोलिसांकडे यासंबंधी तक्रार केल्यानंतर बेकायदा प्रवेशद्वार बनवण्याचे काम थांबवण्यात आले.- सुनील अग्रवाल, पर्यावरणप्रेमी
नवी मुंबईतील पाणथळ जागेकडे जाणाऱ्या मार्गावर लोखंडी कुंपण टाकून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न खासगी विकासकाकडून सुरू आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दोन दिवसांपासून एनआरआय तलाव परिसरात खासगी विकसकाची मनमानी सुरू असून शनिवारी तलावाकडे जाणारा रस्ता कुंपण घालून बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. मोठा उद्याोगपती असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला ही जागा बळकावायची आहे. – राजीव सिन्हा, पर्यावरणप्रेमी