पनवेल ः पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून ते रविवारी रात्रीपर्यंत आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या २४ तासांत राजकीय पक्षांच्या अवैध फलकबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख हे रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसले. आयुक्तांच्या थेट सहभागामुळे शहर विदृप करणारी अवैध फळकबाजीचा सूपडा साफ झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुक्त देशमुख यांच्यासह अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली चारही प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे अतिक्रमन विरोधी पथक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन ही कारवाई केली. या धडक कारवाईचा धसका घेऊन अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजकीय कार्यालयांवरील झेंडे स्वत: काढून टाकले तसेच कार्यालयांवरील पाट्यांवरील पक्षांची चिन्हे व पक्षाचे नाव झाकून टाकले. 

हेही वाचा – जोगेश्वरीतील शिवसैनिक ठाकरे गटात, रविंद्र वायकर यांनी पक्ष सोडल्यानंतरही जोगेश्वरीत ठाकरे गटाचेच वर्चस्व ?

आयुक्त देशमुख यांनी रविवारी पालिका क्षेत्रात पाहणी दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना दिल्यावर शहरात राजकीय पक्षांचे अवैध फलक लावलेत का याची पाहणी केली. कळंबोलीत काही ठिकाणी फलकबाजी असल्याने आयुक्त देशमुख यांनी प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटाने कळंबोली येथे विविध लोखंड बाजारातील बिमा कॉम्पलेक्स आणि मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर या ठिकाणी कंटेनरमध्ये कार्यालय सुरु केले होते. त्या दोनही कंटेनर कार्यालयांवर पालिकेच्या पथकाने कारवाई केली. विशेष म्हणजे, शिंदे गट शिवसेनेने शनिवारी ‘धर्मवीर वाहतूक सेने’च्या कार्यालयाचे उद्घाटन ठाण्यातील बड्या पुढाऱ्यांच्या हस्ते केले होते. सेनेला २४ तासांत हे कार्यालय बंद करावे लागले. पालिकेने आतापर्यंत सुमारे ४५०० राजकीय पक्षांचे झेंडे, ३२०० लहानमोठे फलक, विना परवानगी २५०० मोठे फलक जप्त केले आहेत. 

हेही वाचा – गणपत गायकवाडांच्या नाराजीमुळे खासदार श्रीकांत शिंदे सावध, कल्याण पूर्वमध्ये विकासकामांचा धडाका

हेही वाचा – सांगलीसाठी आघाडीतून मैत्रीपूर्ण लढतीसाठी कॉंग्रेसचा दबाव

खोटे आश्वासन देणाऱ्यांवर गुन्हा नोंदविणार

आयुक्त देशमुख यांनी अवैध फलकबाजीवर कारवाई करताना राजकीय पक्षांना परवानगी घेऊनच आचारसंहिता लागू असल्याने जाहीरात करण्याची सूचना दिली आहे. तसेच आचारसंहितेच्या काळात मालमत्ता कराविषयीसुद्धा खोटी आश्वासने नागरिकांना दिल्यास आश्वासन देणाऱ्यांवर गुन्हे नोंदवू असा इशारा दिला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enforcement of code of conduct in panvel action on illegal hoarding ssb