शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्या नावाचे उरण मधील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय येत्या २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २००८ ला स्थापन करण्यात आलेल्या संस्थेचे पहिले उद्धिष्ट व स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मुंबई आणि नवी मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या जवळ असूनही उरण मध्ये एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई किंवा नवी मुंबई गाठावी लागत आहे.
हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता
उरण तालुका हा राज्यातील औद्योगिक दृष्ट्या प्रगत आहे. या परिसरात देशातील जेएनपीटी बंदर,ओएनजीसी चा तेल शुद्धीकरण प्रकल्प,देशातील पहिला वायू विद्युत केंद्र,भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस भरणा प्रकल्प आणि येऊ घातलेल्या शिवडी न्हावा सागरी सेतू,विरार अलिबाग कॉरिडॉर, नेरूळ उरण रेल्वे यामुळे उरण मधील औद्योगिक विस्तार होणार आहे. मात्र या उद्योगात निर्माण होणाऱ्या उच्चपदी स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे हा मुख्य उद्धेश संस्थेने महाविद्यालय उभारताना ठेवला आहे. उरण मधील विविध राजकीय विचारांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली आहे.
हेही वाचा : खासदार राजन विचारे यांची नवी मुंबई पोलिसांसोबत झाली जोरदार बाचाबाची
त्यासाठी सिडको कडून ५ एकरचा मोक्याच्या ठिकाणी भूखंड ही मिळाला आहे. सुरुवातीला संस्थेने संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करून तरुणांना दिलासा दिला होता. त्यानंतर ही अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीसाठी उरण मधील ओएनजीसी व जेएनपीटी या दोन्ही प्रकल्पाना प्रकल्प सामाजिक जबाबदारी निधी (सी.एस.आर.) मधून निधीसाठी आपला प्रस्ताव दिला आहे. यातील जेएनपीटीने कामगार विश्वस्तांनी केलेल्या पाठपुराव्याने १ कोटी ६० लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तर ओएनजीसी कडून प्रस्ताव मंजुरीची अपेक्षा आहे.
लोकनेते दि.बा. पाटील यांनी अपल्या हयातीत प्रथमच आपलं नाव महाविद्यालय देण्याचे मान्य केले होते. त्यांच्या नावाने उरण मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याकरिता संस्थेच्या पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सोमवारी झालेल्या या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत, कार्याध्यक्ष,कामगार विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, सचिव प्रमिला पवार,काशीनाथ गायकवाड, संतोष पवार व साई संस्थेचे अध्यक्ष नरसु पाटील आदीजण उपस्थित होते. या बैठकीत येत्या शैक्षणिक वर्षात लोकनेते दि. बा. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.