नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणातील हापूसचा हंगाम सुरू असून इतर राज्यांतील आवकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर एपीएमसी बाजारात जुन्नर हापूसच्या २ डझन पेटीचे ४ बॉक्स दाखल झाले आहेत. पंरतु, खरा हंगाम हा १५ मे नंतरच सुरू होईल, मात्र यंदा अवघे ३५ टक्के ते ४० टक्के उत्पादन राहील, असे मत बागायतदार यांच्याकडून व्यक्त होत आहे.
मे अखेर किंवा जूनमध्ये एपीएमसी बाजारात जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जुन्नर येथील हापूस गळून पडले आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल उत्पादन पाण्यात गेलं आहे. जून महिन्यात सुरुवातीला कोकणातील हापूस हंगाम संपल्यानंतर जुन्नर हापूस हंगामाला सुरुवात होते, तर जून अखेर दशेहरी, राजापुरी आंबा दाखल होण्यास सुरुवात होते.
हेही वाचा – नंदुरबार: मोटार दालनाच्या आगीत सहा ट्रॅक्टर भस्मसात
जुन्नर येथील हापूस तयार होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाची बरसात शिवाय पुण्यातील काही विभागांत झालेली गारपीट यामुळे जुन्नर हापूसच्या उत्पादनाला फटका बसला आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर पावसाने उत्पादनावर पाणी फेरले असून, आंबे गळ झाली. त्यामुळे यंदा जुन्नर हापूसचे अवघे ३५ टक्के ते ४० टक्के उत्पादन असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. एपीएमसी बाजारात दोन डझन पेटीचे ४ बॉक्स दाखल झाले असून, प्रति डझन ८००-१००० रुपयांनी विक्री झाली आहे.