नवी मुंबई : पामबीचलगतच्या एनआरआय संकुलाच्या मागील बाजूस असलेल्या सेक्टर ६० येथील जमिनींवरील ‘पाणथळ’ आरक्षण हटवून त्या निवासी बांधकामासाठी खुल्या करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. पालिकेच्या दाव्यातील फोलपणा उघड करणारी छायाचित्रेच पर्यावरणप्रेमींनी प्रसिद्ध केली असून त्यात या जमिनींवरील जैवविविधतेचे अस्तित्व दिसून येत आहे.
नवी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला सादर केलेल्या विकास आराखड्यात अनेक वादग्रस्त बदल करण्यात आले आहेत. अडवली, भुतवली, बोरीवली या गावांमधील शेकडो एकरचा हरितपट्टा निवासी संकुलांसाठी खुला करुन देत असताना सीवूड-नेरुळ येथे महापालिकेनेच टाकलेले पाणथळींचे आरक्षण उठवून त्याठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात आल्याने यासंबंधीच्या तीव्र प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींमध्ये उमटू लागल्या आहेत. याच जमिनींवर आलिशान बंगल्यांची उभारणी करण्यासाठी एक अब्जाधीश उद्योगपती प्रयत्नशील असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
हेही वाचा…कल्याण ते तळोजा मेट्रो १२ कामाला अखेर सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कामास आरंभ
एनआरआय संकुलास लागून एक मोठा पट्टा राज्य सरकारने यापुर्वीच सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून बहाल केला. त्यानंतर येथे एका मोठया उद्योगपतीचा बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पास लागूनच असलेल्या पाणथळींवर फ्लेमिंगो अधिवासाच्या जागीच सिडकोने गोल्फ कोर्सचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात पर्यावरणवाद्यांनी उच्च न्यायालयात लढा दिला. उच्च न्यायालयाने गोल्फ कोर्सचे काम थांबविण्याचे आदेश देताच संबंधित बिल्डर आणि सिडकोकडून या आदेशास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि स्थगिती आदेश मिळवण्यात आले. स्थगिती आदेश येताच या पट्ट्यातील खारफुटी तोडून नष्ट करण्याची कामे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच आता महापालिकेने या जमिनीवर टाकलेले ‘पाणथळ’ आरक्षण हटवल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत.
पर्यावरणवाद्यांना अंधारात ठेवून निर्णय
पामबिच मार्गावल असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस असलेले नेरुळ सेक्टर ५२ (ए) भागातील पाणथळ क्षेत्र निवासी संकुलांसाठी खुले करत असताना एनआरआय संकुल ते टि.एस.चाणाक्य दरम्यान असलेले ‘पॉकेट बी’मधील ३० हेक्टरपेक्षा अधिक पाणथळीचे क्षेत्रही महापालिकेने निवासी संकुलांसाठी खुले केले आहे. महापालिकेने सादर केलेल्या प्रारुप विकास आराखड्यात या सर्व भागाचा उल्लेख पाणथळ जागा असा करण्यात आला होता. या आरक्षणाचे स्वागत त्यावेळी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आले होते. मात्र, या जमिनीवर लक्ष ठेवून असलेल्या ठरावीक बिल्डरांनी हरकती नोंदवल्याची माहिती पुडे येत आहे. महापालिकेनेही बिल्डरांची तळी उचलून पाणथळी हटवण्याचा निर्णय अंतिम विकास आराखड्यात घेतला.
नवी मुंबईतील पाणथळी वाचवण्यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरणावर होणारा हा आघात आपण मूकपणे बघू शकत नाही. त्यासाठी आम्ही सर्व नवी मुंबईकरांना एकत्र येण्याचे आवाहन करतो. – सुनील अगरवाल, ‘सेव्ह नवी मुंबई एन्वायरमेंट’
महापालिकेने प्रारुप आराखड्यात पाणथळ क्षेत्राचे आरक्षण टाकल्याने आम्ही निर्धास्त राहीलो. फ्लेमिंगो अधिवासासाठी आवश्यक आरक्षण असल्याने त्यास हरकत नोंदविण्याची गरजही नव्हती. प्रारुप आराखड्यातील हे आरक्षण महापालिका पुढेही कायम ठेवेल अशी आम्हाला खात्री होती. मात्र महापालिकेने ठराविक हरकतींची दखल घेत पर्यावरण प्रेमींचा विश्वासघात केला आहे. – सुयोग शेलार, पर्यावरण प्रेमी
हेही वाचा…सुनियोजित नवी मुंबईचे बकालीकरण? हिरवे पट्टे, पाणथळ जमिनी, सायकल ट्रॅक निवासी संकुलांसाठी आंदण?
टीएस चाणाक्य मागील बाजूस असलेल्या भागात आम्ही नियमीत फेरफटका मारण्यास जात असतो. करावे गावाच्या विरुद्ध दिशेकडून या पाणथळीस लागूनच असलेल्या जमिनींवरुन थेट खाडीच्या दिशेने जाणारे अनेक मार्ग आहेत. येथे फ्लेमिंगो तसेच खाडीवर येणाऱ्या दुर्मीळ पक्षांना पहाण्यासाठी दररोज शेकडोंच्या संख्येने नागरिक येत असतात. या संपूर्ण भाग निवासी संकुलांसाठी खुले केला जात असेल तर ते धक्कादायक आहे. – हरमितसिंग पड्डा, सायकलस्वार नेरुळ