सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबर कोकणातील तिन्ही जिल्ह्य़ांत घरोघरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याची परंपरा असून यावर्षी उरण तालुक्यात १८ सार्वजनिक, तर साडेबारा हजार घरगुती गणपतींची स्थापना करण्यात आलेली आहे.
रायगडसह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण गणला जातो. यामध्ये कुटुंबात किमान एक तरी गणपतीची स्थापना होते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवाची परंपरा अधिक आहे.
उरण तालुक्यात सार्वजनिक मंडळांचा दहा दिवसांचा गणपती, तसेच घरगुती गणपतींची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये दीड दिवसांच्या गणपतीसह पाच दिवसांच्या गणपतींचा समावेश आहे. यामध्ये पाच दिवसांच्या म्हणजे गौरींसह विसर्जित होणाऱ्या गणपतींची संख्या मोठी आहे. यावर्षी अनेक गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अनेकांनी मखरांची सजावट ही कागद, नैसर्गिक व कागदी फुले, पाने यांनी तसेच विजेच्या रोषणाईने केलेली आहे.
घरगुती गणपतींसमोर विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्याची प्रथा कायम आहे. तर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध विषयांवरील चलचित्रांद्वारे सजावट केलेली आहे.
गणेश विसर्जनासाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींनी विसर्जन घाट आणि तलावांवर विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये जीवरक्षकांचाही समावेश आहे. उरण शहरातील गणेश विसर्जनाच्या थेट प्रक्षेपणाचीही सोय करण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा