लोकसत्ता टीम
उरण: शनिवारी उरणच्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात लाल बावटा बांधकाम कामगार संघटना स्थापन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स(सीआयटीयु)या केंद्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली या लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून उरण मधील असंघटित बांधकाम कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत सीआयटीयुचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड भूषण पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी या कामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना कामगारांना नोंदणीकृत करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कामगारांच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळच्या माध्यमातून विविध योजना लागू होणार आहेत. त्यानुसार अविवाहित कामगाराला लग्नासाठी ३० हजार रुपये, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना, जीवणज्योती विमा, सुरक्षा विमा, महिलांना नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ तर शस्त्रक्रिया २० हजार आर्थिक सहाय्य, गंभीर आजारासाठी कुटुंबियांसह १ लाख रुपये, कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास ५ लाख तर नैसर्गिक मृत्यू नंतर २ लाखांची मदत तर मृत्यूनंतर पत्नीला दरवर्षी २४ हजार प्रमाणे पाच वर्षे मदत, त्याचप्रमाणे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी १ ली ते ७ वी प्रत्येक वर्षी २ हजार ५०० रुपये, ८ वी ते १० साठी ५ हजार रुपये, १० वी व १२ वी साठी १० हजार रुपये (यासाठी ५० टक्के गुण आवश्यक) पदवी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ही मदत देण्याची तरतूद आहे. यामध्ये कामगारांना पत्नीला ही या योजनांचा लाभ मिळणार आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई: मोबाईल देण्यास मनाई केल्याने झालेल्या झटापटीत हल्ला, आरोपी फरार
यावेळी सीआयटीयूचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुसूदन म्हात्रे,शशी यादव,जयवंत तांडेल व निमंत्रक अरुण म्हस्के आदींनी कामगारांना मार्गदर्शन केले. व संघटनेच्या वतीने शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.